नवी दिल्ली – देशात पहिली खासगी ट्रेन तेजस २०१९ मध्ये सुरू झाली होती. ही ट्रेन नवी दिल्ली ते लखनौ या मार्गावर चालते. तेजसचं ऑपरेशन रेल्वेची सब्सिडियरी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड टूरिज्म कॉर्पोरेशन(IRCTC) कडून होतं. आता देशातील अनेक रेल्वे मार्गावर खासगी कंपन्यांकडून रेल्वे धावणार आहे. भारतीय रेल्वे ३ क्लस्टरमध्ये खासगी ट्रेन प्रकल्पासाठी बोली लावण्यात येणार आहे.
रेल्वेला IRCTC आणि MEIL कडून बोली लावण्यात येत आहे. या ३ क्लस्टरमध्ये मुंबई २, दिल्ली १ आणि दिल्लीच्या २ खासगी ट्रेन प्रकल्पासाठी बोली मिळणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, तीन क्लस्टरमध्ये जवळपास ३० जोड्या म्हणजे ६० खासगी ट्रेन्सची सुरू करण्याची तयारी आहे. यासाठी ७२०० कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. देशाच्या विविध मार्गावर खासगी ट्रेन मार्च २०२३ पासून सुरू होणार आहे. त्यासाठी मार्च २०२२ पर्यंत टेंडर फायनल केले जाईल. अधिक खासगी ट्रेन मेक इन इंडियातंर्गत भारतात बनवल्या जातील. रेल्वेच्या या प्रकल्पात खासगी कंपन्या त्यांच्या हिशोबात भागीदारी घेतील.
देशात किती मार्गावर खासगी ट्रेन चालणार?
मागील वर्षी सरकारने देशात १०९ मार्गावर १५१ ट्रेन्स चालवण्याची परवानगी देण्याच्या प्लॅनवर काम सुरू केले आहे. या प्लॅननुसार खासगी कंपन्यांना रेल्वे चालवण्याची परवानगी देण्यात येईल. रेल्वे मंत्रालयाने यासाठी खासगी कंपन्यांकडून बोली मागवल्या आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनवर गुड्स शेड्स आधुनिककरणासाठी खासगी कंपन्यांना काम देण्याची योजना आहे.
रेल्वे विकासात खासगी कंपन्या किती गुंतवणूक करू शकतात?
एका अंदाजानुसार, रेल्वेच्या विकासात ५० लाख कोटी खासगी गुंतवणूक असू शकते. रेल्वेच्या मागच्या बैठकीत तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी ५० लाख कोटींची खासगी गुंतवणूक गरजेचे आहे असं म्हटलं होतं. खासगी कंपन्या इतकी रक्कम रेल्वे प्रकल्पात गुंतवू शकते. रेल्वे मंत्रालयाने हा विचार सुरू केला आहे की, ही गुंतवणूक कशी आणायची? या पॉलिसीवर अंतिम आराखडा बनवणं सुरू आहे.
देशात कधीपर्यंत सुरू होणार १५१ खासगी ट्रेन?
खासगी ट्रेनच्या योजनेत रेल्वेने २०२२-२३ मध्ये १२ ट्रेन्स सुरू करण्याची योजना बनवली आहे. २०२३-२४ मध्ये ४५, २०२५-२६ मध्ये ५० आणि पुढील आर्थिक वर्षात ४४ ट्रेन चालवण्याची योजना बनवली आहे. २०२६-२७ मध्ये एकूण खासगी ट्रेन्सची संख्या १५१ होईल. खासगी कंपन्यांना प्रवासी ट्रेन चालवण्याची परवानी देण्यासाठी रेल्वेने जुलै महिन्यात देशातील १०९ मार्गावर १५१ अत्याधुनिक ट्रेन्स सुरू करण्यासाठी कंपन्यांना निमंत्रण दिलं आहे.
खासगी ट्रेनचा दर काय असेलआणि ते निश्चित कोण करेल?
एका रिपोर्टनुसार, खासगी ट्रेन्सचा दर निश्चित करण्याचा अधिकार खासगी कंपन्यांना असेल. कंपन्यांना त्यांच्याप्रमाणे दर लागू करण्याची मुभा असल्याचं भारतीय रेल्वे बोर्डाचे चेअरमन वीके यादव म्हणाले.
कोणकोणत्या कंपन्या खासगी ट्रेन चालवण्यासाठी इच्छुक?
एल्सटॉम, बॉम्बार्डियर इंक, जीएमआर इंफ्रा लिमिटेड आणि अदानी एंटरप्रायझेस रेल्वे ऑपरेशनमध्ये भागीदारी घेऊ शकतात. या खासगी कंपन्यांनी रेल्वेत गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सध्या कोणत्या खासगी ट्रेन्स सुरू आहेत?
देशात सध्या IRCTC ३ ट्रेन्सचं व्यवस्थापन करते. ज्यात वाराणसी-इंदूर मार्गावर काशी महाकाल एक्सप्रेस, लखनौ-नवी दिल्ली तेजस आणि अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेसचा समावेश आहे. या ३ खासगी ट्रेन्स आहेत. परंतु कोरोनामुळे या बंद आहेत.