नवी दिल्ली -रेल्वे प्रवास महागणार का? माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांनंतर सर्वत्र ही चर्चा सुरू आहे. मात्र, यावर आता रेल्वेने स्वतःच महत्वाचा खुलासा केला आहे. प्रवास भाडेवाढीसंदर्भात कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे भारतीय रेल्वेने म्हटले आहे.
भारतीय रेल्वेने यासंदर्भात सोमवारी एक निवेदन जारी केले आहे. यात सांगण्यात आले आहे, की ''काही माध्यमांनी प्रवास भाडे वाढण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हे वृत्त तथ्यहीन आहे. याला कसल्याही प्रकारचा आधार नाही. रेल्वे भाडेवाढीसंदर्भात कसल्याही प्रकारचा विचार सुरू नाही. माध्यमांना सल्ला देण्यात येतो, की अशा प्रकारचे कुठलेही वृत्त प्रसिद्ध करू नये.''
रेल्वेने गेल्या वर्षी 1 जानेवारीला रेल्वे भाडेवाढ केली होती. तेव्हा प्रति किलोमिटर चार पैशांची वाढ केली होती. एसी-1,2,3, चेयरकार, एक्झिक्यूटिव्ह श्रेणीसह स्लिपर आणि जनरल श्रेणीच्या बेसिक भाड्यात वाढ केली होती. मेल-एक्सप्रेसच्या स्लीपर श्रेणीमध्ये दोन पैसे प्रति किलोमीटरची दरवाढ करण्यात आली होती.
कोरोना व्हायरस संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दीर्घकाळ रेल्वे सेवा ठप्प असल्यानेही रेल्वेला मोठा घाटा सहन करावा लागला आहे. अद्यापही ट्रेन पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. ज्या सुरू आहेत, त्यातही अनेकवेळा बोग्या रिक्या राहत आहेत.