नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना (६० वर्षांवरील) रेल्वे तिकिटावरील सवलतीसाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनाकाळापूर्वी रेल्वे तिकिटावर मिळणारी ही सवलत कोरोनानंतर बंद झाली होती. त्याबाबत लोकसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना भाड्यामध्ये मिळणाऱ्या सवलतीवर कोरोनाकाळात लागू केलेले निर्बंध अजून काही काळ कायम राहणार आहेत. रेल्वेच्या उत्पन्नामध्ये झालेली घट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने आता रेल्वेच्या तिकिटावरील सवलतीवर घातलेले निर्बंधही हटवले जातील, असे वाटणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेमंत्र्यांच्या या निर्णयामुळे धक्का बसला आहे. मात्र रेल्वे मंत्र्यांनी हे निर्बंध कधीपर्यंत लागू राहतील, हे स्पष्टपणे सांगितलेले नाही. भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांसह इतर अनेक वर्गातील प्रवाशांना रेल्वे तिकिटावर सवलत देते. सध्या यातील तीन प्रकारच्या प्रवाशांना तिकिटावर मिळणाऱ्या सवलतीवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामध्ये चार प्रकारचे दिव्यांग, ११ प्रकारच्या आजारांनी पीडित रुग्ण आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आपल्या लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला होता. त्याचा फटका रेल्वेच्या महसुलालाही बसला. रेल्वे मंत्रालयाच्या उत्तरानुसार २०१९-२० आ आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीतून येणाऱ्या उत्पन्नात घट झाली होती. रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, तिकिटावर मिळणाऱ्या सवलतीचा बोजा हा रेल्वेवर पडत असतो. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसह काही अन्य कॅटॅगरीतील प्रवाशांना तिकिटावर मिळणाऱ्या सवतलीवरील निर्बंध कायम राहतील.