नवी दिल्ली : रेल्वेने दोन वर्षांपूर्वी सुरु केलेली फ्लेक्सी फेअर योजना पुरती फसल्याने आता ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना नेहमीच्या दरातच 40 ट्रेनची तिकिटे खरेदी करता येणार आहेत.
रेल्वेने मागणीनुसार भाडे बदलणारी प्रणाली लागू केली होती. मात्र, प्रवासांना ही तिकिटे विमानापेक्षाही महाग मिळत होती. 9 सप्टेंबर 2016 ला रेल्वेने 44 राजधानी, 46 शताब्दी आणि 52 दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ही प्रणाली सुरु केली होती. यानुसार प्रवाशांना एकून तिकिटांच्या केवळ 10 टक्के तिकिटेच सामान्य दराने मिळत होत. बाकी 90 टक्के तिकिटे ही मागणीनुसार भाडे कमी-जास्त होणाऱ्या प्रणालीवर विकली जात होती.
सुरवातीची 10 टक्के तिकिटे विकली गेल्यानंतरच्या 10 टक्के तिकिटांचा दर हा सामान्य तिकिटांपेक्षा 10 टक्के जास्त आकारला जात होता. ही वाढ जास्तीतजास्त 50 टक्क्यांपर्यंत होत होती. म्हणजेच शेवटच्या 10 टक्के तिकिटांचा दर दीड पट वाढत होता. ही प्रणाली लागू असलेल्या ट्रेनपैकी 50 टक्के रिकाम्या जात असलेल्या ट्रेन या प्रणालीपासून मुक्त करण्यात येणार आहेत. अशा 40 ट्रेन आहेत. तर उर्वरित 102 ट्रेनमध्ये तिकिटांची विक्री वाढविण्यासाठी रेल्वे 'अखेरचे मिनिट' ही योजना आणणार आहे. या योजनेंतर्गत ज्या ट्रेनमध्ये 60 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण होत असेल त्या ट्रेनमध्ये चार दिवस आधीपर्यंत तिकिट आरक्षित केल्यास 50 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे.
फ्लेक्सी फेअर योजनेविरोधात प्रवाशांकडून वाढत्या तक्रारी पाहून रेल्वेने डिसेंबरमध्ये चौकशी समिती नेमली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.