Vande Bharat Express Train: देशात वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता आणि प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच भारतीय रेल्वे स्लीपर वंदे भारत ट्रेनवर जोरदार काम करत असून, पुढील वर्षीच्या सुरुवातीला याची चाचणी सुरू होऊ शकते, असे सांगितले जात आहे. मात्र, आताच्या घडीला सुरू असलेल्या वंदे भारत ट्रेनला दोन स्लीपर डबे जोडण्याची योजनाही भारतीय रेल्वेकडून आखली जात आहे. देशातील ४ मार्गांवर ही योजना प्रथम कार्यान्वित केली जाणार आहे. यानंतर या योजनेच्या विस्ताराबाबत विचार केला जाणार आहे.
वंदे भारत ट्रेनमध्ये एक एक टप्प्याने स्लीपर डबे जोडले जाणार आहेत. या योजनेची सुरुवात लांब पल्ल्याच्या वंदे भारत एक्सप्रेस सेवांपासून सुरू होणार आहे. या ट्रेनना आधी एक ते दोन स्लीपर डबे जोडले जाणार आहे. वंदे भारतचे स्लीपरचे डबे आयसीएफमध्ये तयार केले जात आहेत. मार्च २०२४ पर्यंत स्लीपर वंदे भारत प्रवाशांच्या सेवेत आणण्याची रेल्वेची योजना आहे. परंतु, त्याआधी स्लीपर डबे कसे आहेत, त्यांना प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी रेल्वे आता सेवेत असलेल्या वंदे भारत ट्रेनमध्ये एक ते दोन स्लीपर डबे जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे.
४ मार्गांवरील सेवांना प्रथम प्राधान्य
पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्याच्या वंदे भारत सेवांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे डबे जोडले जाणार आहेत. ज्यामध्ये स्लीपर कोच बसवले जातील, त्यामध्ये वाराणसी-नवी दिल्ली, राणी कमलापती-हजरत निजामुद्दीन, माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली, नागपूर-इंदौर या मार्गांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. नव्या स्लीपर कोचचे तिकीट दर काय असतील, याबाबतही रेल्वे बोर्डाचे अधिकारी विचारमंथन करत आहेत.
दरम्यान, नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल बोलायचे तर, ही देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही एकमेव वंदे भारत एक्सप्रेस आहे, जिचा नवी दिल्ली ते प्रयागराज जंक्शनपर्यंतचा सरासरी वेग ताशी १०० किमी आहे. जानेवारी २०२४ मध्ये या ट्रेनला एक ते दोन स्लीपर डबे जोडले जाण्याची योजना आहे.