नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने अधिक विशेष गाड्या (Special Trains) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दसरा आणि दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी १२ जोड्या म्हणजेच २४ विशेष गाड्या चालवल्या जातील. या गाड्यांच्या १५६ फेऱ्या असणार आहेत, असे पश्चिम रेल्वेने (Western Railway) सांगितले आहे.
पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, या १२ जोड्या विशेष गाड्यांपैकी ५ जोड्या वांद्रे टर्मिनसहून, २-२ जोड्या इंदूर आणि उधनाहून धावणार आहेत. तर प्रत्येकी १-१ जोड्या ओखा, पोरबंदर आणि गांधीधाम स्टेशनहून धावणार आहेत. रेल्वेच्या माहितीनुसार, या सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.
१७ ते २२ ऑक्टोबरदरम्यान बुकिंगरेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व विशेष गाड्यांचे विशेष भाडे असणार आहे. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील आणि यासाठी बुकिंग १७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. दरम्यान, यावेळी प्रवासादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल.
३९२ फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन दुसरीकडे, भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात १९६ जोड्या म्हणजेच ३९२ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन ((festival special trains)) म्हणून या विशेष गाड्या धावणार आहेत. दुर्गापूजा, दसरा, छठ पूजा आणि दिवाळीदरम्यान सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या विशेष गाड्या कोलकाता, पाटणा, वाराणसी, लखनऊ व इतर ठिकाणी चालविण्यात येणार आहेत. या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर यादरम्यान धावणार आहेत.