नवी दिल्ली : अफगाणिस्तानात अपहरण झालेल्या ज्युडिथ डिसूजा या भारतीय महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली असून शनिवारी त्या मायदेशी परतल्या. ज्युडिथ यांचे सायंकाळी सहा वाजता नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ज्युडिथ यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली.ज्युडिथ आगा खान फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ तांत्रिक सल्लागार म्हणून काम करतात. त्यांचे कार्यालय अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आहे. गेल्या ९ जून रोजी दहशतवाद्यांनी त्यांचे त्यांच्या कार्यालयाच्या जवळून अपहरण केले होते. ज्युडिथ डिसूझा यांची सुटका करण्यात आल्याचे सांगताना मला आनंद होत आहे. ज्युडिथ यांच्या सुटकेसाठी मदत केल्याबद्दल मी अफगाणिस्तानचे आभार मानते, असे टिष्ट्वट सुषमा स्वराज यांनी केले होते. मूळच्या कोलकाता येथील रहिवासी असलेल्या ज्युडिथ यांच्या सुखरूप सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालय सातत्याने अफगाण प्रशासनाच्या संपर्कात होते. वंदे मातरम्, असे स्वराज यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. ज्युडिथ यांचे अपहरणकर्ते कोण होते आणि त्यांची सुटका कशी करण्यात आली हे स्पष्ट होऊ शकले नाही. ज्युडिथ यांच्या सोबत आणखी दोन जणांचे अपहरण करण्यात आले होते. ज्युडिथ यांच्या सुटकेसाठी भारताचे अफगाणिस्तानातील राजदूत मनप्रीत व्होरा यांनी केलेल्या प्रयत्नांचीही स्वराज यांनी प्रशंसा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)कुटुंबीयांकडून आभारज्युडिथ यांच्या सुटकेबद्दल कोलकाता येथील त्यांच्या कुटुंबियांनी सरकारचे आभार मानले आहेत. ‘आमच्या बहिणीच्या सुटकेबद्दल आम्ही भारत सरकारचे आभारी आहोत. आम्ही तिची वाट पाहत असून, माध्यमांनी आमच्या खासगीत्वाचा आदर करावा, अशी आमची त्यांना विनंती आहे,’ असे ज्युडिथ यांची बहीण अग्नेस यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले. ज्युडिथ यांच्या कुटुंबियांनी गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ज्युडिथ यांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.ज्युडिथा या भारतीय जनतेच्या सदिच्छा दूत म्हणून अफगाणिस्तानात तेथील लोकांच्या भल्यासाठी काम करीत होत्या, असे या पत्रात म्हटले होते. शांघाय सहकार्य संघटनेच्या गेल्या महिन्यात ताश्कंद येथे झालेल्या परिषदेदरम्यान मोदी यांनी अफगाणचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गणी यांना ज्युडिथ यांची सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.
भारतीय तरुणीची सुटका
By admin | Published: July 24, 2016 2:28 AM