मुंबई, दि. 1 - बलात्कार म्हणा किंवा लैंगिक अत्याचार....एखाद्या महिलेला सामोरं जावी लागणारी सर्वात भयाण परिस्थिती. एखाद्या बलात्कार पीडितेला होणा-या वेदना, तिच्या मनात सुरु असलेला कलह तिच्याशिवाय दुस-या कोणालाच कळू शकत नाही. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस, प्रशासन कितीही प्रयत्न करत असलं तरी अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचे सल्ले दिले जातात. पण समाजातील या विकृत प्रवृत्ती रोखण्याचा प्रयत्न करताना कोणी दिसत नाही. मात्र या घटना रोखण्यासाठी एमआयटीची एक विद्यार्थिनी पुढे सरसावली आहे. या तरुणीने एक असं स्टिकर आणलं आहे ज्यामुळे लैंगिक अत्याचार होण्याआधीच रोखता येईल.
मनिषा मोहन असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. मनिषाने एक स्मार्ट स्टिकर तयार केलं असून यामुळे एखाद्या महिलेवर वाईट प्रसंग ओढावला तर काही सेकंदातच अलर्ट मिळणार आहे, सोबतच तो रोखताही येणं शक्य होणार आहे. हे डिव्हाईस युझर-फ्रेंडली बनवण्यात आलं असून ब्ल्यूट्यूथच्या माध्यमातून मोबाइलशी कनेक्ट करता येऊ शकतं. हे स्मार्ट स्टिकर कपड्यावर कोणत्याही ठिकाणी लावता येऊ शकतं.
हे डिव्हाईस कसं काम करतं ?हे डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी एक अॅप डाऊनलोड करण्याची गरज आहे. सोबतच आपल्यावर तशी परिस्थिती आली तर ज्यांना संपर्क साधायचा आहे अशा पाच जणांचे नंबर एमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून सेव्ह करावे लागतील. या स्टिकरमध्ये मायक्रोप्रोसेसर आणि सेन्सर्स असतील. जेव्हा जबरदस्ती होईल, कोणी कपडे खेचण्याचा प्रयत्न करत असेल किंवा अन्य कोणती संशयित घटना घडली तर युजरला कन्सेंट मेसेज पाठवला जातो. जर युजरने 30 सेकंदात उत्तर दिलं नाही, तर पुढच्या 20 सेंकदात मोबाइल आवाज करण्यास सुरुवात करतो. यानंतर तुम्ही सेव्ह केलेल्या एमर्जन्सी फोन नंबरवर तुमचं लोकेशन पाठवलं जातं. यापैकी एका नंबरवर फोन जातो आणि तुम्ही आधी सेव्ह करुन ठेवलेला ऑडिओ ऐकवला जातो. यामुळे समोरील व्यक्तीला तुम्ही अडचणीत आहात याची माहिती मिळते आणि मग त्याप्रमाणे मदत किंवा कारवाई करता येऊ शकते.
पहा व्हिडीओ -
एवढं सगळं असूनही तुम्हाला यात काहीच विशेष वाटत नसेल तर अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी सर्वात जास्त फायद्याची आहे. जर का हे स्टिकर तुम्ही कपड्यावर लावलं असताना विसरलात आणि धुण्यात गेलं तर....असा प्रश्न पडला असेल तर चिंता करण्याचं कोणतंच कारण नाही कारण हे वॉश फ्रेंडली असून अजिबात खराब होणार नाही.
हे स्टिकर बनवण्यामागे मनिषा मोहन या भारतीय तरुणीचा हात आहे. मनिषा मोहन एमआयटीमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत आहे. या डिव्हाईसला 'इंटरपिंड' असं नाव देण्यात आलं आहे. एका प्रोजेक्टचा भाग म्हणून मनिषाने हे डिव्हाईस तयार केलं आहे.
चेन्नईत काही तरुणी विद्यार्थिनींना ठराविक वेळेनंतर काम करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. नेमकी याच गोष्टीतून मनिषाला हे स्मार्ट स्टिकर तयार करण्याची कल्पना सुचली. आतापर्यंत 70 जणांवर हे स्टिकर टेस्ट करण्यात आलं असून सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.