ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - सुमारे २ कोटी अब्ज सूर्याएवढे वस्तूमान असणाऱ्या ‘सरस्वती’ दिर्घीकांच्या महासमूहांचा शोध भारतीय शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यामुळे विश्वाच्या निर्मिती विषयी मांडण्यात आलेल्या खगोलीय घटनांचा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्सतील (आयुका) शास्त्रज्ञ जॉयदीप बागची यांच्या नेतृत्त्वाखाली देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने आंतरराट्रीय स्तरावरील हे संशोधन जगासमोर मांडले आहे.
आयुकासह इंडियन इस्टिट्यूट आॅफ सायन्स अॅण्ड एज्युकेशन रिसर्च(आयसर),नॅशनल इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी)जमशेदपूर व केरळमधील न्यूमन कॉलेजमधील विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांनी ‘सरस्वती’ दिर्घीकांचा शोध लावला आहे. आयुकाचे शास्त्रज्ञ जॉयदीप बागची यांनी २००२ मध्ये दिर्घीकांच्या समूहाविषयीचे संशोधन सुरू केले होते. मात्र, पुढील काही वर्षात याबाबतची अधिक माहिती समोर आली होती. त्यानंतर देशातील विविध संशोधन संस्थांमधील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने त्यांनी सलग २-३ वर्षात हे संशोधन पूर्ण केले.अमेरिकेतील नामांकित अॅस्टोफिजिक्स जर्नलमध्ये बागची यांचा शोधनिबंध गुरूवारी प्रसिद्ध झाला आहे.
आकाशगंगेमध्ये एवढ्या मोठ्या दिर्घीकांचा समूह असण्याबाबतची माहिती प्रथमच समोर आली आहे. त्यामुळे अंतराळ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचे नवे दालन खुले झाले आहे. पुण्यातील आयसर संस्थेतील शिशिर संख्यायान या शास्त्रज्ञाने या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दिर्घीकांची व्याप्ती ६० कोटी प्रकाशवर्ष एवढी असण्याची शक्यता आहे. तसेच या दिर्घीकांचा समूह मीन राशीमध्ये असल्याचे शोध प्रबंधात स्पष्ट करण्यात आले आहे. ४३ दिर्घीकांच्या समूहाला ‘सरस्वती’असे नाव देण्यात आले आहे.