नवी दिल्ली - जगातील 100 हून अधिक देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे अनेक देशांत कोरोनावर मात करण्यासाठी औषधी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात भारतालाही मोठे यश आले आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी कोरोना व्हारसचे स्ट्रेन्स वेगळे केले आहेत. यामुळे आता कोरोना विरोधातील औषध आणि लस तयार करण्यास मोठी मदत मिळेल.
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहिनीनुसार, वैज्ञानिक मंडळी बऱ्याच दिवसांपासून कोरोना व्हायरसवर काम करत होते. पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचे स्ट्रेन वेगळे करण्यात यश मिळवले आहे.
शास्त्रज्ञांच्या या यशामुळे कोरोना व्हायरसवर मात करण्यात मोठी मद मिलेल. या व्हायरसचे स्ट्रेन्स वेगळे केल्यामुळे आता व्हायरसच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या किट तयार करणे, औषधाचा शोध लावणे आणि लसीवर संशोधन करण्यासाठी फायदा होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारचे संशोधन करण्यात केवळ अमेरिका, जापान, थायलंड आणि चीन या चारच देशांना यश मिळाले आहे. एका माध्यमातील वृत्तानुसार, पुण्यातील आयसीएमआरमधील एक शास्त्रज्ञ प्रिया अब्राहम यांनी म्हटले आहे, की कोरोनासंदर्भात भारताने आता पहिला टप्पा पार केला आहे.
अब्राहम यांनी म्हटले आहे, की आग्र्यातील सहा रुग्ण आणि इटलीतील काही नागरिकांकडून मिळालेल्या व्हायरसमधील स्ट्रेन्स शास्त्रीय प्रक्रियेच्या माध्यमाने वेगळे करण्यात आले आहेत. त्या स्ट्रेन्सची तूलना वुहानमधील कोरोना व्हायरसच्या स्ट्रेन्सशी करण्यात आली. यात, या दोन्ही व्हायरसमध्ये 99.98 टक्के साम्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
याशिवाय एखाद्या आजाराला नष्ट करण्यासाठी अथवा रोखण्यासाठी त्याची संपूर्ण माहिती मिळवणे आवश्यक असते. यालाच आपण पहिला टप्पा म्हणू शकतो. यानंतरच लस अथवा उपचार आदिंवर कार्य केले जाते.