लेह - लडाख या केंद्रशासित प्रदेशातील काकजंग भागातून भारतीय मेंढपाळांना चिनी सैनिक हुसकावून लावत असल्याचा प्रकार एका व्हिडीओमुळे उजेडात आला आहे. ही २ जानेवारीची घटना असून काकजुंगचा परिसर आमचा असल्याचा दावा करणाऱ्या चिनी सैनिकांवर संतप्त भारतीय मेंढपाळांनी दगडफेक केली.
लडाखच्या न्योमा मतदारसंघातील काकजंग येथे ३५ व ३६ क्रमांकाच्या टेहळणी चौकीजवळ ही घटना घडली. न्योमा येथील कौन्सिलर इशे स्पाल्झांग यांनी सांगितले की, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत असलेला हा प्रदेश वादग्रस्त असल्याचा कांगावा चीनने सुरू ठेवला आहे. त्या परिसरात चीनचे सैनिक आपल्या वाहनांतून आले होते. या संदर्भातील साडेसहा मिनिटांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिनी सैनिकांनी दमदाटी केल्यानंतरही काकजंग परिसरातून निघून जाण्यास भारतीय मेंढपाळांनी ठाम नकार दिला; तसेच चिनी सैनिकांवर दगडफेक केली. ही घटना उजेडात आल्यानंतर लष्कर, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी), स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काकजुंगला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. प्राण्यांना चरण्यासाठी काकजंग हा महत्त्वाचा भाग आहे. २०१९मध्ये या परिसरात चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. (वृत्तसंस्था)
प्रश्नांचे भिजत घोंगडेमतभेदांवर भारत व चीन अद्याप योग्य तोडगा काढू शकलेले नाहीत. या दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये तोडगा शोधण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या होत असतात. २०२२ मध्येही दोन्ही देशांच्या लष्करांत संघर्षाचे प्रसंग उद्भवले होते.