ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - भारतीय सैनिकांना निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवण्यात येत असल्यामुळे सैनिक स्वत:चे बूट व गणवेश स्वत:च्या पैशातून खरेदी करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड बूट व युनिफॉर्मच्या उत्पादनासाठी जबाबदार असल्याचे संरक्षण मंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार गणवेशाच्या दर्जाबाबत प्रचंड तक्रारी आहेत, ते एकतर लगेच उसवतात आणि त्यांचा रंगही लवकर उडतो. त्यामुळे सैनिकांचे गणवेश एकसारखे दिसत नाहीत. त्याखेरीज गणवेशाची मापं हादेखील तक्रारीचा भाग आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाच्या अधिका-यांनी या तक्रारींची दखल घेत चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले.
सैनिकांना दर १८ महिन्यांनी नवे बूट देण्यात येतात, परंतु ते तीन ते चार महिन्यांच्यावर टिकत नाहीत अशी तक्रार आहे. त्यामुळे बाजारातून दुसरे बूट विकत घेण्याखेरीज काही पर्याय नसतो अशी व्यथा एकाने व्यक्त केली आहे.
संरक्षण खात्याच्या मुख्यालयाने उत्पादनांमध्ये त्रुटी असल्याचे मान्य केल्याचेही इकॉनॉमिक टाइम्सने नमूद केले आहे. जवळपास १२ लाखाच्या घरात संख्या असलेल्या भारतीय सैन्यातील जवानांवर बूट व गणवेश निकृष्ट दर्जामुळे स्वत:च खरेदी करण्याची वेळ येत असेल तर ती खेदाची बाब म्हणावी लागेल.