Indian Soldiers Rescue Operation Video: देशाच्या उत्तर भागात पावसाने काही दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर खूपच वाढताना दिसतोय. त्यामुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड विध्वंस झाल्याचे चित्र आहे. ओडिशामध्येही पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. या चार राज्यांतील विविध अपघातांतील मृतांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे तर शेकडो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये डोंगरांना तडे जाऊ लागले आहेत. त्याचा वैष्णोदेवी यात्रेवरही परिणाम झाला आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे, विविध सुरक्षा दलातील जवान आणि काही स्वयंसेवक पूरबाधित क्षेत्रात प्राण पणाला लावून बचाव कार्य पूर्णत्वास नेताना दिसत आहेत.
संततधार बरसणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील चक्की नदीवरील रेल्वे पुलाचा काही भाग मुसळधार पावसामुळे वाहून गेला. शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुराच्या घटनांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांसह सुमारे २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्यात लष्कर तैनात करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे तिरंगा हाती घेऊन बचाव कार्यदेखील सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील अनेक भाग जलमय झाले आहेत. संततधार पावसामुळे पौरी, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डेहराडूनमधील मालदेवता परिसराला ओव्हरफ्लो सॉंग नदीमुळे आलेल्या पुराचा फटका बसला आहे. डेहराडून ते जॉली ग्रँट विमानतळाला जोडणारा उड्डाणपूल पुरात वाहून गेला. अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. सरखेत गावात ढगफुटीमुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. दर्हाळी नदीला तडा गेल्याने पीर पंजाल पर्वतरांगाच्या वरच्या भागात येथे अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मदत आणि बचाव कार्यात लष्कर तैनात करण्यात आले आहे. समुद्रातील खोल दाबामुळे ओडिशात मुसळधार पाऊस पडत आहे. पुरामुळे ओडिशातील अनेक किनारी भागांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे भिंती कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला. मयूरभंज, बालासोर आणि केओंझार जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झाली.