मुंबई : भारतीय शेअर बाजार जपान, चीनसारख्या प्रगत राष्टांच्या शेअर बाजारापेक्षाही सक्षम आहे. तसेच रुपया डॉलरसमोर कमकुवत झाला असला तरी, जगातील अन्य चलनांच्या तुलनेत तो बराच सक्षम आहे, असा विश्वास सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी व्यक्त केला.भारतीय उद्योग महासंघातर्फे शुक्रवारी घेतलेल्या परिषदेत भारतीय शेअर बाजार सध्या प्रचंड अस्थिर असल्याची चिंता वक्त्यांनी मांडली. त्यागी यांनी मात्र अन्य देशांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार सर्वाधिक सुरक्षित असल्याचे मत मांडले. ते म्हणाले की, एप्रिल ते सप्टेंबर या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ६.५० टक्के परतावा दिला. पण याच काळात ब्रिटनमधील शेअर बाजारातील परताव्यात एक टक्का व चीनमधील बाजारांच्या परताव्यात १८ टक्के घसरण झाली. ब्राझिल व जपानच्या बाजारांचा परतावा अनुक्रमे ५.७ व ४.५ टक्के होता. भारतीय शेअर बाजार सध्या १२ टक्के अस्थिर आहे. पण अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरीया, हाँगकाँग व ब्राझिल येथील बाजार भारतापेक्षा अस्थिर आहेत.
भारतीय शेअर बाजार जपान, चीनपेक्षा सक्षम; सेबी प्रमुखांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 5:30 AM