नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीच्या (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) कलश गुप्ता या विद्यार्थ्याने जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा स्वतःच्या नावे केली आहे. कलश गुप्ता आयआयटी दिल्लीच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून त्याने ८७ देशांतील तब्बल १ लाख स्पर्धकांवर मात करत टीसीएस कोडविटा-सीझन १० या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
जगातील सर्वात मोठी संगणक प्रोग्रामिंग स्पर्धा कोडविटा ही एक प्रतिष्ठित कोडिंग स्पर्धा असून जगातील सर्वात मोठी संगणक प्रोग्रामिंग स्पर्धा म्हणूनही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. कोडविटाची रचना एक खेळ म्हणून प्रोग्रामिंगला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली आहे. जगभरातील स्पर्धकांना त्यांची कौशल्ये एकमेकांसमोर मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे हा त्याचा उद्देश आहे. सर्व स्पर्धकांना वास्तविक जीवनातील आव्हानांचा सामना करावा लागतो.
१० हजार डॉलरचे बक्षीसस्पर्धेचा विजेता ठरल्यावर कलशला १० हजार डॉलर रकमेचे बक्षीस देण्यात आले. तसेच, स्पर्धेतील चारही विजेत्यांना टीसीएसच्या संशोधन आणि नावीन्यपूर्ण संस्थेत इंटर्नशिपची संधी मिळेल. कलश व्यतिरिक्त, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणारे स्पर्धक अनुक्रमे चिली आणि तैवानचे होते. आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांच्या हस्ते स्पर्धा जिंकल्यानंतर कलशचा सत्कार करण्यात आला. कलश गुप्ताने २०१८ मध्ये आयआयटीत प्रवेश घेण्यासाठी जेईईत देशभरात तिसरा क्रमांक मिळवला होता.
‘टॉप-३मध्ये येईल असे कधी वाटले नव्हते’स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या तिघांमध्ये येईल असेही मला कधी वाटले नव्हते. पण हा अद्भूत अनुभव होता. पहिल्यांदा माझ्यात आत्मविश्वास नव्हता, कारण पहिल्या प्रश्नासाठीच मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. मात्र, जसजशा कोडिंगच्या अन्य काही समस्या सोडवत गेलो तसतसा माझा आत्मविश्वासही उंचावला आणि मी पहिल्या तिघांमध्ये येईल याची खात्री होती, असे कलश म्हणाला.