ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 8 - कॅलिफोर्नियात भारतीय विद्यार्थ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मुबीन अहमद असं या 26 वर्षीय तरुणाचं नाव असून सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. मुबीन अहमद तेलंगणाचा रहिवासी आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत तो शिकत आहे. एका दुकानात तो पार्ट टाईम म्हणून काम करत होता, त्याच ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला.
माझ्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता मला त्यांच्याकडून फोन आल्यानंतर कळल्याचं मुबीनच्या वडिलांनी सांगितलं आहे. 4 जून रोजी संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली. 5 जून रोजी नातेवाईकांना फोन करुन घटनेची माहिती देण्यात आली.
"रुग्णालय प्रशासनाने मला फोन करुन तुमच्या मुलाची प्रकृती गंभीर असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. आम्हाला त्याच्याकडे जायचं असून त्यासाठी व्हिसाची गरज आहे", असं मुबीनचे वडिल मुजीब अहमद यांनी सांगितलं आहे.
मुबीन 2015 मध्ये कॅलिफोर्नियाला गेला होता. "मी काही राजकीय प्रतिनिधी आणि जलमंत्री टी हरिश राव यांची भेट घेतली असून त्यांनी मला मदतीचं आश्वासन दिलं आहे. यासंबंधी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे", असं मुजीब अहमद बोलले आहेत.