जामनगर : गुजरात विधानसभा निवडणुक 2022 चे निकाल समोर आले आहेत. भाजपने पुन्हा एकदा विक्रमी जागा मिळवत आपला बालेकिल्ला वाचवला आहे. लक्षणीय बाब म्हणजे भाजपला यावेळी विक्रमी जागा मिळवण्यात यश आले आहे. या आधी 2002 मध्ये भाजपला 182 पैकी 127 जागा मिळाल्या होत्या. यावेळी हा आकडा 157 च्या जवळ गेला आहे. या निवडणुकीत अनेक नामांकित उमेदवार आपले नशीब आजमावत असताना सर्वांच्या नजरा जामनगर उत्तरच्या निकालाकडे लागल्या होत्या. कारण इथे क्रिकेटर रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा या भाजपच्या उमेदवार होत्या.
भाजपच्या उमेदवार रिवाबा जडेजा यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आम आदमी पक्षाचे (AAP) उमेदवार करशनभाई कर्मूर यांचा 50,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या विजयानंतर रिवाबा आणि भारतीय संघाचा क्रिकेटर रवींद्र जडेजाने रोड शो देखील केला. जनतेने दिलेले प्रेम आणि आपुलकीबद्दल जामनगरवासीयांचे त्यांनी आभार मानले. माध्यमांशी संवाद साधताना रिवाबा म्हणाल्या, "गुजरातची जनता भाजपसोबत होती आणि यापुढेही राहील."
जडेजाने राजकारणात येण्याचे दिले होते संकेत आता रवींद्र जडेजा देखील पत्नी विधानसभेत पोहोचल्यानंतर लवकरात लवकर आपली राजकीय खेळी सुरू करू शकतो. पत्नी रिवाबा यांचा उमेदवारी अर्ज भरताना पत्रकारांशी बोलताना खुद्द रवींद्र जडेजाने राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मला अजून 4 ते 5 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे, त्यानंतर मी राजकारणातही उतरेन, असे जडेजा म्हणाला होता. रिवाबा यांची ही निवडणूक फार चर्चेत आली होती कारण त्यांना कुटुंबातीलच विरोधाचा सामना करावा लागला. पती रवींद्र जडेजा त्यांच्यासोबत निश्चितच होता, पण वहिणी नयना स्वत: या जागेवरून काँग्रेसचे तिकीट मागत होत्या. सासरे आणि वहिनी दोघेही त्यांच्या विरोधात प्रचार करत होते. मात्र अखेर रिवाबा यांनी आमदार होण्याचा मान मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"