नवी दिल्ली - लडाख येथील गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांसमोर भारताच्या जवानांना निशस्त्र का पाठवण्यात आले होते, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावरून निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींनी केलेला आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. गलवान खोऱ्यातील भारताचा एकही जवान निशस्र नव्हता, मात्र करारानुसार तिथे हत्यारांचा वापर करता येणार नव्हता आणि त्यानुसार तो केला गेला नाही. असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना एस. जयशंकर म्हणाले की, आपल्याला वास्तव समजून घेतले पाहिजे. सीमेवर कर्तव्य बजावत असलेला प्रत्येक जवान शस्त्रसज्ज असतो. आपली चौकी सोडत असताना सर्व जवान आपली शस्त्रे सोबत घेतात. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या सैनिकांजवळसुद्धा शस्त्रे होती. चिनी सैनिकांशी हिंसक झटापट झाली, तेव्हा हत्यारांचा वापर न करण्याबाबतचा आदेश स्पष्ट होता. सीमेवर झालेल्या तणावावेळी हत्यारांचा वापर करायचा नाही हा नियम भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये दीर्घकाळापासून चालत आला आहे. १९९६ आणि २००५ मधील करारांनुसार ही परंपरा पाळली जात आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबतच्या झटापटीत झालेल्या जवानांच्या मृत्यूवरून केंद्र सरकारला खरमरीत शब्दात जाब विचारला होता. देशाच्या वीर जवानांना जवानांना धोक्याच्या दिशेने निशस्त्र कुणी आणि का पाठवले, अशी विचारणा त्यांनी केली होती.
ट्विटरवर व्हिडीओ शेअर करून राहुल गांधी यांनी या घटनेवरून जाब विचारला होता, ‘’बंधु भगिनींनो चीनने भारताच्या निशस्र सैनिकांची हत्या करून एक मोठा अपराध केला आहे. माझा प्रश्न आहे की, या वीरांना निशस्त्र धोक्याच्या दिशेने कुणी आणि का पाठवले, याला कोण जबाबदार आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता.