लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या देशांची यंदाच्या वर्षीची यादी टेस्ट ॲटलास या वेबसाइटने तयार केली असून त्यात भारताने पाचवा क्रमांक पटकाविला आहे. या यादीत इटली, ग्रीस, स्पेनला अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळाला आहे. भारतीय खाद्यपदार्थांसाठी ४.५ गुण मिळाले आहेत. गरम मसाला, मलई, तूप, बटर गार्लिक नान, खिमा आदी गोष्टींचा समावेश असलेले भारतीय खाद्यपदार्थ जगभरातील लोकांना पसंत असल्याचे या यादीत म्हटले आहे.
या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये जपान, अमेरिका, फ्रान्स, तुर्कस्थान, पेरू, मेक्सिको या देशांचाही समावेश आहे. चिनी खाद्यपदार्थ जगात अत्यंत लोकप्रिय आहेत असे म्हटले जाते. पण टेस्ट ॲटलासच्या यादीत चीनला ११ वे स्थान मिळाले आहे.
ही यादी इंटरनेटवर झळकल्यानंतर तिला आतापर्यंत ३.६ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १५ हजारपेक्षा जास्त लोकांनी या यादीवर कॉमेन्ट केल्या आहेत. त्यातील बहुतेक लोकांनी यादीविषयी समाधान व्यक्त केले आहे. तर काही लोकांनी ही यादी खवय्यांच्या आवडीवर अन्याय करणारी आहे असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)
मुंबईचे रेस्टॉरंट उत्कृष्ट
भारतीय खाद्यपदार्थांसाठी मुंबईच्या काळबादेवी परिसरातील श्री ठाकर भोजनालय, बंगळुरू येथील करावल्ली, दिल्लीतील बुखारा, दम पुख्त, गुरुग्राम येथील कोमोरिनसह सुमारे ४५० रेस्टॉरंट उत्कृष्ट असल्याचे टेस्ट ॲटलासच्या यंदाच्या वर्षीच्या यादीत म्हटले आहे.
इंग्लंडचा समावेश ही चूक तर नाही?
- सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या देशांच्या टेस्ट ॲटलासने तयार केलेल्या यादीसंदर्भात एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, या यादीत इंग्लंडचे नाव बहुधा नजरचुकीने झाले असावे.
- इंग्लंडचे खाद्यपदार्थ कधीही चविष्ट नसतात. ही यादी म्हणजे बाष्कळपणा आहे असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
- मोरोक्को, इथिओपिया या देशांची नावे या यादीत असायला हवी होती, असे काहींनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"