नवी दिल्ली- ज्या पद्धतीनं शशी थरूर यांनी वापरलेल्या ''फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन'' या शब्दासाठी लोकांना गुगलचा आधार घ्यावा लागला होता. त्याच पद्धतीनं आता राहुल गांधी यांनी उच्चारलेल्या एका शब्दाचा लोक गुगलवर शोध घेत आहेत. एएनआयच्या एडिटर स्मिता प्रकाश यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. त्यानंतर राहुल गांधींनी त्या पत्रकारावर आरोप केले होते.स्मिता प्रकाश या 'Pliable' पत्रकार असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर स्मिता प्रकाश यांनीही राहुल गांधींच्या त्या विधानावर आक्षेप नोंदवला होता. देशातल्या सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीनं टीका करणं शोभनीय नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या. त्यांनी टि्वट करत सांगितलं होतं की, तुम्हाला मोदींवर टीका करायची आहे तर जरूर करा, परंतु माझ्यावर टीका करणं हे आक्षेपार्ह आहे. राहुल गांधींनी वापरलेल्या 'Pliable' हा शब्द आता लोक गुगलवर सर्च करत आहेत.गुगलच्या माहितीनुसार प्लायेबल या शब्दाचा अर्थ एखाद्यासमोर शरणागती पत्करण्यासारखा आहे. तसेच एखाद्याच्या प्रभावात येणारी व्यक्ती, असाही या शब्दाचा अर्थ होतो. त्यानंतर काँग्रेसनं एक व्हिडीओ प्रसिद्ध करत प्लायेबलचा अर्थ आक्षेपार्ह नसल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस म्हणते, ही तर आताच्या पत्रकारितेची दुर्दशा आहे. एखाद्या पत्रकारानं सहजतेनं शरणागती पत्करल्याच्या आरोपावर सोशल मीडियावरून तिखट प्रतिक्रिया येणं योग्य नसल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
‘द पॅरोडॉक्सियल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकाची माहिती देताना शशी थरूर यांनीही इंग्रजीतला असाच एक बुचकळ्यात टाकणारा शब्द वापरला होता. त्यामुळे सोशल मीडियावरील बहुतांश युजर्स संभ्रमात पडले होते. या शब्दाचा अर्थ तर दूरच पण उच्चार करणंही अवघड होता. ‘फ्लोक्सिनॉसिनिहिलिपिलिफिकेशन’ हा शब्द त्यांनी उच्चारला होता, त्याच अर्थ पहिल्यांदा कोणालाच समजला नव्हता. ‘विनाकारण कोणतीही गोष्ट निरर्थक ठरविण्याची सवय’ असा या शब्दाचा अर्थ असल्याचा गुगल सर्चमधून समोर आलं आहे. हा लॅटिन भाषेतील शब्द होता.