मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी रात्री बरोबर 9 वाजता 9 मिनिटांसाठी देशातील जनतेने घरातील सर्व लाईट बंद करून दिवे, मेनबत्या आणि टॉर्च लावत कोरोनाच्या लढाईत आम्ही सर्वजण एक आहोत, हे दाखवून दिले आहे.
कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. आता तो आपल्या देशातही वेगाने हातपाय पसरू लागला आहे. त्याचा सामना करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशातच लॉकडॉऊन केले आहे. या काळात जनतेने आपल्या घरातच राहावे आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या कोरोनाचा पराभव करण्यासाठी जनतेने काय करावे आणि काय करून नये यासंदर्भातही वारंवार सरकारकडून सूचना केल्या जात आहे. जनतेकडूनही मोठ्या प्रमाणावर याचे पालन केले जात आहे. आज पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आम्ही सर्व एक आहोत याचे दर्शन घडवले आहे.
पंतप्रधानांसह या नेत्यांनी आपापल्या निवासस्थानीच प्रज्वलित केले दिवे -खुद्द पंतप्रधान मोदी यांनीही आपल्या निवासस्थानी सर्व लाईट बंद करून समई लावून दीप प्रज्वलित केला. याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, उपराष्ट्रपती वंकय्या नायडू, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ आदी नेत्यांनी आपापल्या घरी घरातील सर्व लाईट बंद करून दिवे आणि मेनबत्त्या लावल्या आणि कोरोनाला हरवण्याचा संकल्प केला.
राष्ट्रपती रामनाथ यांनी कुटुंबियांसह प्रज्वलित केले दिवे -यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आपल्या घरातील सर्व लाईट विजवून कुटुंबीयांसह दिवे प्रज्वलित केले आणि कोरोनाच्या लढाईत देशवासीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याशिवाय उद्योग आणि कला क्षेत्रातील मंडळींनीही पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उस्त्फूर्त प्रतिसाद देत, आम्हीही कोरोनाच्या लढाईत सर्व भारतीयांसोबत असल्याचे दाखवून दिले.
सर्वच राज्यांतील जनतेचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अगदी उत्तेरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंतच्या सर्वच राज्यांतील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनीही पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. घोषणांनी दुमदुमले आकाश -यावेळी अनेकांनी घरातील मेनबत्या आणि अगदी दिवाळीच्या पणत्याही काढून ठेवल्या होत्या. अनेक ठिकाणी दिवे सजवून ठेवण्यात आले होते. तर काही ठिकाणी दिव्यांचे डिझाईनही बघायला मिळाले. तसेच या वेळी अनेक घरांतून आणि सोयट्यांमधूनही 'गो कोरोना गो, भारत माता की जय आणि एकतेचा संदेश देणाऱ्या घोषणा ऐकायला मिळाल्या. यावेळी आसमंत दुमदुमून गेला होता
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी केले होते आवाहन -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्व भारतीयांना आवाहन, 'सामूहिक संकल्प' करण्यासाठी पाच एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी आपापल्या घरातील लाईट बंद करून दिवे मेनबत्ती अथवा मोबाईलच्या टॉर्ट लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र आज जनतेने मोदींना जो काही प्रतिसाद दिला आणि घराघरात जे दीप उजळले त्यातून आज कोरोनाविरोधातील देशाच्या एकतेचे जगाला दर्शण घडले आहे.