नवी दिल्ली - कोरोनामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. अन्य धार्मिक यात्रांसोबतचयंदा हज यात्राही झाली नाही. कोरोनाचा परिणाम आता पुढील वर्षी होणाऱ्या हज यात्रेवरही दिसत आहे. मात्र, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय आणि केंद्रीय हज समितीने आगामी हज यात्रेसाठी अर्जप्रक्रिया सुरू केली आहे. ही अंतिम तारीख 10 डिसेंबर होती. मात्र अर्ज अत्यंत कमी आले. त्यामुळे समितीने ही मुदत आता 10 जानेवारीपर्यंत वाढविली असून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंना कोरोनाची लस देण्यात येईल, असे केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.
''आम्ही हज यात्रा 2021 ची तयारी सुरू केली असून 100 टक्के डिजिटल हज यात्रा करणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर आहे. विशेष म्हणजे हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत हजारो अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे,'' असे नक्वी यांनी सांगितलंय.
दरम्यान, कोरोनाचा हज यात्रेवर पडलेला परिणाम महाराष्ट्रातही दिसत आहे. 2021 मध्ये होणाऱ्या हज यात्रेसाठी गेल्या आठवड्यापर्यंत फक्त 5 हजार 176 लोकांचेच अर्ज आले आहेत. मागील वर्षी अर्जांची संख्या 28 हजार 700 होती. मात्र, कोरोनामुळे हज यात्रा रद्द झाली होती. 2019 मध्ये 35 हजार 877 लोकांनी अर्ज केले होते. 2020च्या तुलनेत पुढील वर्षी होणाऱ्या यात्रेसाठी एक तृतियांश अर्ज आले आहेत. हज यात्रा महागणे हे यात महत्वाचे कारण सांगितले जात आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे हज यात्रेकरूंच्या जागा सरकारने घटविल्या होत्या. मात्र, आता खर्च कमी झाल्यासंदर्भात सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.
यात्रेकरुंना खर्चकोरोनामुळे जागांचा कोटा एक तृतियांश करण्यात आला. यामुळे खर्च वाढला होता. परंतु, आता केंद्रीय हज समितीने सर्क्युलर काढून खर्च कमी केला आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या यात्रेकरूंना आता फक्त ३,२९,२८० रुपयांचा खर्च येणार आहे. त्यांना मुंबईहून रवाना केले जाईल.