नवी दिल्ली - भारताच्या शिक्षण व्यवस्थेत क्रिएटिव्हिटीचा अभाव असल्याचे परखड मत अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांनी व्यक्त केले. भारत दौऱ्यावर आलेल्या वोजनियाक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना हे मत व्यक्त केले. भारताबद्दल तुमचे मत काय आहे ? उद्या एखादी जागतिक तंत्रज्ञान कंपनी भारतातून उदयाला येईल असे आपल्याला वाटते का ? या प्रश्नावर ते म्हणाले कि, मी शास्त्रज्ञ नाही.
मला भारताच्या संस्कृतीबद्दल पुरेशी माहिती नाही. मोठया तंत्रज्ञान कंपनीसाठी मला भारतात संधी दिसत नाही. माझ्या माहितीनुसार इन्फोसिस भारतातील मोठी तंत्रज्ञान कंपनी असू शकते. तुम्हाला असे का वाटते ? या प्रश्नावर ते म्हणाले कि, शैक्षणिक गुणवत्तेवर यशाचे मोजमाप करण्याची भारताची संस्कृती आहे. मला इथे आल्यावर एक गरीब आणि एक श्रीमंत असे दोन भारत दिसले.
श्रीमंत भारतामध्ये अभ्यास करा, शिका, सराव करा, चांगली नोकरी मिळवा आणि आरामदायी सुखासीन आयुष्य जगण्याची संस्कृती आहे. इथेही सिंगापूरसारखेच चालते. मेहनतीने शिक्षण घ्या आणि एमबीएची पदवी मिळवा. तुमच्याकडे मर्सिडीझ असेल पण क्रिएटिव्हिटी कुठे आहे ? असा प्रतिप्रश्न केला.
जेव्हा तुमच्या वागण्याबद्दल अचूक अंदाज वर्तवता येतो तेव्हा क्रिएटिव्हिटी संपून जाते. न्यूझीलंडसारख्या छोटयाशा देशाकडे बघा. लेखक, गायक, अॅथलिट यांच एक वेगळ जग आहे असे वोजनियाक म्हणाले. या मुलाखतीत त्यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्याबरोबरच्या मैत्रीच्या नात्याचे पदरही त्यांनी उलगडले. भविष्यात स्टीव्ह जॉब्सशी बरोबरी करणारा कोणता टेक लीडर तुमच्या नजरेत आहे या प्रश्नावर ते म्हणाले कि, एलन मस्कला दूरदृष्टी असून त्यामुळे जग बदलेल असा विश्वास व्यक्त केला.
स्टीव्ह वोजनियाक अॅपलच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. अॅपल 1 या कॉम्प्युटरचे ते इंजिनिअर आहेत. आता त्यांचा अॅपल कंपनीच्या संचालनात कोणताही सहभाग नसून ते दैनंदिन कामकाजापासून पूर्णपणे दूर आहेत. मी कॉम्प्युटरच डिझाइन तयार केलं पण स्टीव्ह जॉब्सने त्याला उत्पादन बनवलं असे वोझ यांनी सांगितले.