मुंबई : भारतीय मोबाइल ग्राहकांच्या इंटरनेट वापरात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली. सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय वायरलेस ग्राहकांनी तब्बल ५४९१.७ कोटी जीबी डाटा वापरला. वायरलेस डाटा ग्राहकांच्या संख्येत २०१७-१८ मध्ये ३६.३६ टक्क्यांची वाढ झाली.२०१४ मध्ये वायरलेस डाटाचा वापर ८२.८ कोटी जीबी होता. २०१८ मध्ये त्याचे प्रमाण ४६४०.४ कोटी जीबी झाले. यामध्ये सातत्याने वाढ होत असून सप्टेंबर २०१९ पर्यंत हे प्रमाण ५४९१.७ कोटी जीबी एवढे झाले आहे. एकीकडे दूरसंचार कंपन्यांकडून डाटाच्या वापराची किंमत वाढवली जात असली तरी गेल्या दोन वर्षांत डाटा वापरासाठी मिळालेल्या विविध सवलतींमुळे डाटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.भारतीय दूरसंचार नियामक आयोगाच्या अहवालानुसार, २०१४ मधील २८१५.८ कोटी वायरलेस डाटा ग्राहकांच्या तुलनेत ग्राहकांची संख्या सप्टेंबर २०१९ मध्ये ६६४८ कोटी झाली. २०१६ मध्ये ४६४.२ कोटी जीबी डाटाचा वापर झाला होता. २०१७ मध्ये हे प्रमाण वाढून २००९.२ कोटी जीबी डाटा वापरला गेला होता. २जी नेटवर्कवरून ४जी नेटवर्कमध्ये झालेला बदल, विनामूल्य, स्वस्त डाटा प्लॅन, कमी किमतीत स्मार्ट फोन उपलब्ध होणे अशा विविध कारणांमुळे ही वाढ झाली आहे.इंटरनेट वापरात भारत दुसऱ्या क्रमांकावरइंटरनेट वापरामध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे. इंटरनेटच्या एकूण ग्राहकांत भारतीयांचे प्रमाण १२ टक्के आहे. जगात सुमारे ३.८ अब्ज नागरिक इंटरनेट वापरतात. ही संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. जगात सर्वांत जास्त इंटरनेटचा २१ टक्के वापर चीनमधील नागरिक करतात.
भारतीयांकडून होतो ५४९१.७ कोटी जीबी इंटरनेट डाटाचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 3:04 AM