ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - भारतातून परदेशात विमानानं प्रवास करणा-या प्रवाशांना 1 जुलैपासून डिपार्चर कार्ड भरणे आवश्यक नाही. मात्र भारतातून परदेशात रेल्वे, समुद्रमार्गे प्रवास करणा-यांना एम्बार्केशन कार्ड भरावं लागणार आहे. सर्व भारतीयांना आता आंतरराष्ट्रीय विमानतळांवर डिपार्चर कार्ड भरणं सक्तीचं नाही. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जुलै 2017पासून होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. भारतातून परदेशात प्रवास करणा-यांच्या कटकटी काहीशा कमी करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत परदेशात जाणा-या भारतीयांना डिपार्चर कार्ड भरावं लागतं. त्यात नाव, जन्मतारीख, पासपोर्ट नंबर आणि भारतातील पत्ता, विमानाचा नंबर आणि बोर्डिंगची तारीख ही सर्व माहिती भरावी लागते, या सर्व प्रक्रियेत भरपूर वेळ जातो. तसेच ही सर्व माहिती अन्य स्रोतातून यंत्रणेकडे आधीच उपलब्ध असते. त्यामुळेच आम्ही डिपार्चर कार्ड न भरण्याचा निर्णय घेतला आहे, असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना पुरेसा वेळ मिळणार आहे. तसेच मोठ्या संख्येनं प्रवाशांकडून हा फॉर्म भरून घेणा-या अधिका-यांनाही काहीसा दिलासा मिळणार आहे. भारतीय प्रवासी आगमनच्या वेळी सर्व माहिती अधिका-यांना देत असतात. आता विमानतळ अधिकारीच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला प्रवाशांची माहिती उपलब्ध करून देणार आहेत. भारतातल्या नवी दिल्ली, मुंबई, कोचीन, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद तसेच इतर देशांचे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत. तत्पूर्वी पटना, चेन्नई, गुवाहाटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळांवरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग लावण्यात येत नाही. 30 एप्रिलपासून या सहा विमानतळांवर आठवडाभर प्रायोगिक तत्त्वावर बॅगांना टॅग लावण्यात आला नव्हता. याचा परिणाम पाहून पुढील निर्णय आम्ही घेऊ, असे सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले. तसेच जर सर्व सुरक्षिततेच्या दृष्टीने समाधानकारक वाटल्यास सहाही विमानतळांवर लवकरच बॅगेला टॅग लावून स्टॅम्पिंग करण्यात येणार नाही, असेही ओ. पी. सिंह म्हणाले होते. याआधी 1 एप्रिलपासून देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानतळावरील प्रवाशांच्या बॅगेला टॅग न लावण्याचा निर्णय सीआयएसएफने घेतला होता. आता पटना, चेन्नई, गुवाहटी, तिरुअनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ या विमानतळांवर घेतला होता. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून 1992 पासून आपल्या देशात विमानतळांवर बॅगांना स्टॅम्पिंग टॅग लावण्याची पद्धत सुरू झाली. सीआयएसएफचे जवान बॅगेचा टॅग व स्टॅम्प तपासून प्रवाशांना विमानात बसण्यास पाठवतात. ही पद्धत वेळखाऊ तसेच प्रवाशांना डोकेदुखी ठरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे.
परदेशात प्रवास करणा-या भारतीयांना 1 जुलैपासून नो डिपार्चर कार्ड !
By admin | Published: June 19, 2017 6:06 PM