लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल (सीएए) विरोधक खोटी माहिती पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. सीएए लागू केल्यानंतर देशभरात विरोधकांनी या कायद्याविरोधात रान उठविले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, सीएएमुळे कोणाही भारतीयाचे नागरिकत्व किंवा त्याची नोकरी जाण्याची शक्यता नाही.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, तीन शेजारी देशांत धार्मिक छळ झाल्यामुळे तेथील जे अल्पसंख्याक भारतात स्थलांतरित झाले त्यांच्यासाठी सीएए कायदा करण्यात आला आहे. अपप्रचार करून विरोधी पक्ष जातीय भावना भडकावत आहेत.
मतांसाठी राजकारण : अरविंद केजरीवाल
लोकसभा निवडणुकांच्या आधी सीएए कायदा लागू करणे हे भाजपने मतपेढीसाठी केलेले घाणेरडे राजकारण आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ते म्हणाले की, हा कायदा रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे.
...म्हणून आमचा विरोध : ममता बॅनर्जी
सीएए हा कायदा नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सशी (एनआरसी) जोडलेला आहे. त्यामुळेच मी या कायद्याला विरोध करत आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले. त्या म्हणाल्या की, आसाममध्ये आहेत तसे डिटेन्शन कॅम्प आम्ही पश्चिम बंगालमध्ये उघडू देणार नाही.