भारताविरोधात गरळ ओकण्याचे पाकिस्तानचे मनसुबे पुन्हा एकदा धुळीस मिळाले आहेत. चीनच्या अॅप्सवर बंदीची कारवाई केल्यास दीड वर्ष होत असताना आता केंद्र सरकारने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. देशाविरोधात दुष्प्रचार करणाऱ्या 20 पाकिस्तानी युट्यूब चॅनलना सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केले आहे. दोन वेबसाईटविरोधात देखील भारत विरोधी प्रचार करत असल्याचा आरोप ठेवून कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानविरोधी कारवाईमध्ये वेगवेगळे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये मंत्रालयाने 20 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदीचे आदेश दिले आहेत. याचबरोबर दोन वेबसाईट बॅन करण्याचे आदेश इंटरनेट प्रोव्हायडरना दिले आहेत.
ही कारवाई गुप्तचर यंत्रणा आणि मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नांनंतर करण्यात आली आहे. जे चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहेत ते भारतविरोधी दुष्प्रचार पसरविणाऱ्या संघटनांशी संबंधित होते. या चॅनेलद्वारे भारताशी संबंधित असलेल्या विविध संवेदनशील विषय, खोट्या बातम्या आणि काश्मीर, भारतीय सैन्य, अल्पसंख्यांक समुदायांसारख्या विषयांवर हेतुपुरस्सर आणि फुटीरतावादी सामुग्री पोस्ट करण्यात येत होती.
या चॅनलचे 35 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत, तसेच त्यांचे व्हिडीओ 55 कोटीहून अधिकवेळा पाहिले गेले आहेत. या चॅनलवरून राम मंदिर, सीडीएस बिपीन रावत या सारख्या मु्द्यांवर खोट्या अफवा पसरविण्यात आल्या होत्या. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार हे दुष्प्रचार अभियान पाकिस्तानातून चालविण्यात येत असलेल्या एनपीजीचे होते. या संघटनेकडे YouTube चॅनलचे एक नेटवर्क आहे. तसेच काही अन्य चॅनेल आहेत ज्यांच्या यांच्याशी काही संबंध नाही. या चॅनेलचा वापर पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांवरही होण्याची शक्यता होती. यामुळे देश आणि लोकहितासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.