बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक महत्वाचे करार झाले. यासंदर्भात माहिती देताना परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी सांगितले की, बांगलादेशसोबत गंगा पाणी वाटप कराराच्या रिन्यूअलसाठी एक संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली असून यासंदर्भात लवकरच तांत्रिक चर्चा सुरू होईल. याच बरोबर, बांगलादेशातील तीस्ता नदीच्या संवर्धनाचे आणि व्यवस्थापनाचे कामही भारत करणार असल्याचेही क्वात्रा यांनी सांगितले.
बांगलादेशातील तीस्ता नदीचे संवर्धन आणि व्यवस्थापन प्रोजेक्ट हा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण चीननेदेखील या प्रोजेक्टसाठी निधी देण्यास स्वारस्य दाखवले होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, हा प्रोजेक्ट अंदाजे 1 अब्ज डॉलर्सचा आहे. या प्रोजेक्टसाठी भारतानेही स्वारस्य दाखवले होते. याच बरोबर, दोन्ही नेते भेटल्यानंतर, काही मोठी घोषणा होऊ शकते, याची शक्यताही व्यक्त केली जात होती. शेख हसीना जुलै महिन्यात चीन दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळेही ही घोषणा अत्यंत महत्वाची आहे.
1996 मध्ये झाला होता गंगा पाणी वाटप करार - सुमारे 27 वर्षांपूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यात 30 वर्षांसाठी गंगा पाणी वाटप करार अस्तित्वात आला होता. भारताने 1975 मध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात गंगा नदीवर फरक्का धरण बांधले. यावर बांगलादेशने तीव्र आक्षेप घेतला होता. प्रदीर्घ वादानंतर दोन्ही देशांनी 1996 मध्ये गंगा पाणी वाटप करारावर स्वाक्षरी केली होती. या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि शेख हसीना यांनी स्वाक्षरी केली होती. हा करार पुढील 30 वर्षांसाठी करण्यात आला होता.
हा प्रोजेक्ट चीनला मिळणे किती धोकादायक? -जर हा प्रोजेक्ट चीनला मिळाल तर, भारतासाठी भू-राजकीय परिणाम आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोक्याचा ठरू शकतो. या प्रोजेक्टवर चीनचा बऱ्याच दिवसांपासून डोळा आहे. या प्रोजेक्टसाठी चीनने बांगलादेशला अधिकृत प्रस्तावही दिला होता. महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान शेख हसीना यांच्या आगामी चीन दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षरी होण्याचीही शक्यता होती. मात्र चीनला या प्रोजेक्टपासून दूर ठेवण्यासाठी भारताने नुकतेच परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांना बांगलादेशला पाठवले होते. या दौऱ्यादरम्यान क्वात्रा यांनी तीस्ता प्रकल्पासाठी बांगलादेशला भारताच्या निधीचा प्रस्ताव दिला होता.
भारतासाठी का महत्वपूर्ण आहे हा प्रोजेक्ट...? - भौगोलिक, सामरिक आणि भू-राजकीयदृष्ट्या तीस्ता नदी प्रकल्प हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकल्पात चीनचा सहभाग हा भारतासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे, जो संवेदनशील चिकन नेक कॉरिडॉरच्या शेजारी आहे. चिकन नेक हे भारतासाठी रणनितीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे. कारण ते भारताच्या ईशान्य भागाला उर्वरित देशाशी जोडते. याउलट चीन या प्रोजेक्टके दक्षिण आशियातील आपला प्रभाव वाढवण्याच्या आणि या भागातील भारताच्या प्रभावाला आव्हान देण्याच्या संधीच्या स्वरुपात बघतो.