नवी दिल्ली: कोरोना व्हायरसने जगभरात विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात गेल्या २४ तासांत नव्या ६२,५३८ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्राालयाने स्पष्ट केले आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. सध्या ६ लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्याचप्रमाणे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यत एकूण ४१,५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असला तरीही त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत १३ लाख ७८ हजार १०५ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशातला रिकव्हरी रेट ६७.६२% वर पोहोचला आहे. देशात ६ ऑगस्टपर्यत २,२७,२४,१३४ नमुन्यांची चाचणी झाली आहे. यांपैकी गुरुवारी ५,७४,७८३ चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.