नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धावर आज दिवसभर मोठ्या घडामोडी घडत आहेत. युक्रेनमध्ये रशियन सैन्यानं कारवाई करायला सुरुवात केली आहे. युक्रेन आणि रशियाकडून आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. युक्रेनच्या केवळ सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलं जात असल्याचं रशियानं म्हटलं आहे. तर युक्रेननं हल्ल्यात सर्वसामान्य नागरिक मारले गेल्याचा दावा केला आहे.
रशिनायाने आज युक्रेनवर हल्ला केला. रशियाला हल्ल्याला युक्रेनने प्रत्युत्तर दिले आहे. रशियाचे १०० पेक्षा जास्त सैन्य मारल्याचा दावा, युक्रेनने केला आहे. सात रशियन विमाने, चार हेलिकॉप्टर्स आणि लष्करी वाहने उद्धवस्त केल्याचा दावाही युक्रेनने केला आहे. युक्रेनचे ७० लष्करी तळ बेचिराख केल्याचा दावा रशियाने केला आहे. दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय बाजारावरही खूप मोठे परिणाम झाले आहेत. तर कच्च्या तेलाच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. यावरही पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि तेल मंत्रालयानं सविस्तर चर्चा केली आहे.
रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महत्त्वाच वक्तव्य केलं आहे. भारत हा शांततेच्या बाजूनं आहे. रशिया आणि यूक्रेननं चर्चेतून हा प्रश्न सोडवावा, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं आहे. यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यूक्रेनमध्ये विमानं उतरु शकत नाहीत, अशी स्थिती आहे. लवरकरच पर्यायी व्यवस्था करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, रशियाच्या लष्करी सामर्थ्यावर युक्रेन फार दिवस तग धरू शकत नाही. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्या मदतीला लष्कर पाठवणार का, अमेरिकन सैन्य युक्रेनमध्ये उतरणार का, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. या प्रश्नाला तज्ज्ञांनी दिलेलं उत्तर नकारार्थी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर आर्थिक निर्बध लादले आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांनी युक्रेनला लष्करी मदत पुरवण्याची घोषणा केलेली नाही.
आता भारत काय करणार?
२०१४ ते २०२२ या ८ वर्षांत परिस्थिती बरीच बदलली आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांसोबतचे भारताचे संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. रशियासोबतचे संबंध आणखी दृढ झाले आहेत. या कालावधीत चीन बराच आक्रमक झाला आहे. तर रशिया आणि चीनचे संबंध गेल्या काही महिन्यांत सुधारले आहेत. भारतानं पाश्चिमात्य देशांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास रशिया आणि चीन या देशांशी एकाचवेळी शत्रुत्व निर्माण होईल.
दुसरीकडे पाकिस्तान रशियासोबतचे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. संपूर्ण जग पुतीन यांच्यावर टीका करत असताना इम्रान खान मॉस्कोत आहेत. भारत आणि रशियाचे संबंध जुने आहेत. मात्र अमेरिका आणि युरोपियन देशांसोबतचे संबंधदेखील भारताला खराब करायचे नाहीत. त्यामुळे या प्रकरणात भूमिका घेणं भारतासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे.