ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि. २४ - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणातील दोषींनी शासन करण्याची भारताने पाकिस्तानकडे केलेली मागणी ही पूर्णत: समर्थनीय आहे, असे मत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकॉईस हॉलंड यांनी रविवारी व्यक्त केले. होलांद हे आजपासून तीन दिवसांच्या भारत दौ-यावर आले असून ते प्रजासत्ताक दिनानिमित्त होणा-या राष्ट्रीय संचलनासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये भारतीय लष्कराबरोबर फ्रेंच सैन्यामधील सैनिकांची तुकडीही सहभागी होणार आहे.
भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर बोलताना होलांद यांनी 'भारत व फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासंदर्भात समान वैचारिक कटिबद्धता आहे' असेही नमूद केले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना मोंदीच्या नेतृत्वाखालील परराष्ट्र धोरणामध्ये प्रमाणबद्धता आणि प्रबळ इच्छाशक्ती हे दोन्ही घटक आहेत, असेही नमूद केले.
होलंद यांच्या तीन दिवसीय दौ-यादरम्यान भारत फ्रान्सकडून क्षेपणास्त्र प्रणाली व इतर शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेली ३६ रॅफेल जातीची लढाऊ विमाने घेणार आहे, त्याची किंमत सुमारे ६० हजार कोटी रुपये इतकी आहे. मोदींनी गेल्या वर्षी फ्रान्सला दिलेल्या भेटीदरम्यान यासंदर्भात करार झाला होता.