नवी दिल्ली :स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व सरकारांनी भारताला उच्च स्थानी बसविण्यासाठी योगदान दिलेले आहे. काही अपवाद वगळता लोकशाही मजबूत करण्याची देशाची गौरवशाली परंपरा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी म्हटले आहे.
तीन मूर्ती भवन परिसरात नवनिर्मित पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते म्हणाले की, संवैधानिक लोकशाहीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्व पंतप्रधानांनी योगदान दिले आहे. देशातील माजी १४ पंतप्रधानांच्या जीवनदर्शनाबरोबरच त्यांचे योगदान दर्शविण्यात आले आहे. असे आहे संग्रहालय- पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवन व देशाच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे योगदान संग्रहालयात समाविष्ट आहे. त्यांना मिळालेल्या सर्व भेटवस्तूही पाहायला मिळणार आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांना ‘हुंड्यात’ मिळालेला चरखा, चौधरी चरण सिंह यांची डायरी व पी. व्ही. नरसिंह राव यांचा चष्मा पाहायला मिळणार आहे. - मोरारजी देसाई यांची भगवद्गीता, गांधी टोपी, लेखणी, रुद्राक्षमाळाही पाहायला मिळणार आहे. - अटलबिहारी वाजपेयी यांचे भारतरत्न पदक, चष्मा, घड्याळ तसेच चंद्रशेखर यांच्या हस्तलिखित डायरीही येथे आहेत. - इंदिरा गांधी यांची छायाचित्रे, त्यांची भाषणे, पोखरण अण्वस्त्र चाचणीवरील सामग्री, बांगलादेश मुक्तिसंग्राम, बँकांचे राष्ट्रीयीकरण यावरील दस्तावेजाचा यात समावेश आहे.- संगणकासाठी राजीव गांधी यांचा आग्रहही संग्रहालयात प्रदर्शित करण्यात आला आहे.