नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था भीषण स्थितीत असून, कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी सोमवारी राज्यसभेत केली. भारतीय अर्थव्यवस्था ‘अकार्यक्षम डॉक्टरां’च्या हातात असल्याने ही अवस्था उद्भवली आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला.
चिदम्बरम म्हणाले की, बेरोजगारी आणि घसरता उपभोग अशा दुहेरी समस्येने अर्थव्यवस्थेला ग्रासले आहे. लोकांच्या हातात अधिक पैसा राहील, हे पाहण्याची गरज आहे. कनिष्ठ कर अधिकाऱ्यांना अभूतपूर्व अधिकार देऊन ‘कर दहशतवाद’ माजवू नका. नोव्हेंबर, २०१३ मध्ये मोदी यांनी आपणास दिलेला सल्लाच चिदम्बरम यांनी आता वित्तमंत्री सीतारामन यांना दिला. चिदम्बरम म्हणाले की, तो नेता म्हणाला होता की, ‘अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. अर्थव्यवस्थेसाठी वेळ द्या. क्षुद्र राजकारण करू नका.’ हा खरोखरच चांगला सल्ला आहे. वित्तमंत्र्यांना सल्ला देण्यासाठी या सल्ल्याचे वाचन करण्यासारखी चांगली गोष्ट मला करता येणे शक्य नाही.रुग्ण ‘आयसीयूबाहेर’चिदम्बरम यांनी म्हटले की, मोदी सरकारचे चार वर्षे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्था ‘आयसीयू’त आहे. मी मात्र म्हणेन की, रुग्णाला ‘आयसीयू’बाहेर ठेवण्यात आले असून, अकार्यक्षम डॉक्टर रुग्णाकडे नुसतेच पाहत बसले आहेत.