नवी दिल्ली : भारत पाच टक्के आर्थिक मंदीला तोंड देत नसून जगात वेगाने वाढणारी अशी त्याची अर्थव्यवस्था आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले.प्रश्न तासात ठाकूर म्हणाले की, उद्योगांना कर सवलती आणि बँकांचे विलीनीकरण यासह सरकारने अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. ‘पाच टक्के मंदी नाही. हा आकडा तुम्हाला मिळाला कोठून? आम्हाला दाखवा’, असे आव्हान ठाकूर यांनी आम आदमी पक्षाचे (आप) खासदार भगवंत मान यांनी देश आर्थिक मंदीला तोंड देत असल्याचे म्हटल्यावर दिले. ठाकूर म्हणाले की, जगात अनेक देश आर्थिक मंदीला तोंड देत असले तरी आपल्या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची असेल. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने जी पावले उचलली त्याचा विशेष उल्लेख करून ठाकूर म्हणाले की, उद्योगांना, विदेशी थेट गुंतवणूक आणि एमएसएमई सेक्टरला करांत सवलती दिल्या गेल्या आहेत. अनेक बँकांचे विलीनीकरण मोठ्या बँकांमध्ये करण्यात आले आहेत आणि सरकारचे अंतिम ध्येय हे मजबूत पाया असलेल्या चार बँका सक्रिय ठेवणे आणि आर्थिक उपक्रम कसे वाढतील, याची खात्री करणे हे आहे.काळ्या पैशांविरुद्ध कठोर कारवाई केली गेली असून, वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर भरणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे, असे ठाकूर म्हणाले. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सकल देशी उत्पादन (जीडीपी) वाढीचा सरासरी दर हा २०१४-२०१९ कालावधीत ७.५ टक्के होता व हा दर जी-२० देशांमध्ये सर्वात जास्त आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढणारी- अनुराग ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 1:59 AM