लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : “भारताची परीक्षा प्रणाली ‘फ्रॉड’ आहे. लाखो लोकांचा असा विश्वास आहे की जर तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा यंत्रणा खरेदी करू शकता. जर नीट पेपर फुटणे ही यंत्रणेची चूक असेल तर ती सुधारण्यासाठी काय केले?,’ असा थेट सवाल लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित करून ‘नीट’ पेपरफुटीचा विषय उपस्थित केला. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने संसदेचे वातावरण तापले.
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मंत्री स्वतः सोडून सगळ्यांना दोष देत आहेत. देशात काय चालले आहे, याची चिंता लाखो विद्यार्थ्यांना त्रस्त करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सात वर्षांत कोणताही पेपर फुटला नाही : शिक्षणमंत्र्यांचा दावाधर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’शी संबंधित प्रकरणावर सरकारकडे लपविण्यासारखे काहीही नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते अखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतली जात आहे. त्यांनी विरोधकांच्या आरोपांच्या संदर्भात सांगितले की, गेल्या सात वर्षांत ७० पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा नाही. राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा (नीट) ४,७०० केंद्रांवर घेण्यात आली होती; परंतु बिहारमध्ये केवळ एकाच ठिकाणी अनियमितता आढळून आली होती.
जया बच्चन भडकल्याराज्यसभेत प्रश्नाेत्तराच्या तासात पाण्यावरुन विचारलेल्या एका प्रश्नावरुन सपा सदस्य जया बच्चन भडकल्या. त्यांनी गुजरातच्याच दाेन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमुळे भ्रमित झाल्याचे म्हटले. त्यावर सभापती जगदीप धनकड यांनी म्हटले की, मॅडम तुम्ही भ्रमित हाेऊ शकत नाही. त्यावेळी बच्चन यांनी सभापतींवर पक्षपातीपणाचा आराेप केला. त्या म्हणाल्या, तुम्ही सत्ताधारी खासदारांवर टीका करत नाहीत. मात्र, आमच्या सदस्यांवर टीका करता. हे याेग्य नाही. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही.