ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. २४ - श्रीलंकेविरुदच्या दुस-या कसोटीत भारताने २७८ धावांनी विजय मिळवत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१अशी बरोबरी साधली आहे. श्रीलंकेचे सर्व गडी १३४ धावांत बाद झाले. अश्विनने ४२ धावांमध्ये सर्वाधिक ५ बळी मिळवत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिलाच विजय आहे. के. एल. राहुलला 'मॅन ऑफ दि मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू करताना श्रीलंकेची धावसंख्या २ बाद ७२ अशी होती, मात्र श्रीलंकेचे उर्वरित ८ गडी अवघ्या ६२ धावांत तंबूत परतले आणि भारताने सामना खिशात टाकला. श्रीलंकेचा हेराथ ४ धावांवर नाबाद राहिला.
कर्णधार अँजलो मॅथ्यूज (२३), धोकादायक फलंदाज दिनेश चंडीमल (१५) , थिरिमने (११) ,जेहान मुबारक (०), प्रसाद (०) , करूणारत्ने (४६), कौशल (५) व चमिरा (४) हे फलंदाज पटापट बाद झाल्याने श्रीलंकेची डाव कोसळला. करूणारत्ने ४६ धावा करत थोडी झुंज द्यायचा प्रयत्न केला खरा मात्र त्याला इतर फलंदाजांची पुरेशी साथ मिळाल्याने त्यांचा डाव १३४ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे अश्विनने ५, मिश्राने ३ तर शर्मा व यादवने प्रत्येकी १ बळी टिपला.