गांधीनगर : सतत २७ वर्षे गुजरातमध्ये भाजपचा दबदबा असून, अशामध्ये काँग्रेसने आपली सत्ता येण्यासाठी येथे संपूर्ण ताकद लावली आाहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षही भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष पूर्ण गुजरातवर असताना भाजपची नजर मात्र उत्तर गुजरातवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे जन्मगाव आणि मूळ विधानसभा क्षेत्रही उत्तर गुजरातमध्ये आहे. पंतप्रधानांचे घर मेहसाना जिल्ह्यातील वडनगरमध्ये आहे तर गृहमंत्री अमित शहा यांचे बालपण गांधीनगर जिल्ह्याच्या मानसा येथे गेले आहे. यामुळे उत्तर गुजरात भाजपसाठी महत्त्वाचा झाला आहे. भाजपची स्थापना झाल्यानंतर लोकसभेचे पहिले कमळ उत्तर गुजरातमध्येच उमलले होते. भाजपने १९८४ मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. त्यावेळी देशात २ जागा जिंकण्यात त्यांना यश आले होते. यातील एक जागा उत्तर गुजरातमधील होती.पंतप्रधानांचे येथे विशेष लक्ष या निवडणुकीत पंतप्रधान उत्तर गुजरातवर विशेष लक्ष देत आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच त्यांचे कार्यक्रम येथे सुरू झाले होते. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर मेहसाणातील धरोई धरण ते अंबाजीपर्यंतचा परिसर विकसित करायचा असल्याचे म्हटले होते.