मुंबई - सध्याच्या काळात पत्रकारिता क्षेत्रात महिला असणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण एक वेळ अशी होती जेव्हा एखादी महिला फोटो पत्रकार असणं एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हतं. पण होमाई व्यारावाला यांनी जुन्या विचारसरणीला छेद देत फोटो पत्रकारितेत करिअर केलं आणि अशाप्रकारे त्या देशाच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट झाल्या. भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार असणा-या होमाई व्यारावाला यांची आज 104 वी जयंती आहे. यानिमित्त गुगलने डुडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वतंत्र भारतातील पहिल्या तीन दशकांतील अनेक घटना होमाई व्यारावाला यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या.
होमाई व्यारावाला यांचा जन्म एका पारसी कुटुंबात गुजरात येथे झाला. त्यांना 'डालडा 13' या टोपणनावाने ओळखले जात होते. या नावाने ओळखले जाण्याचे कारण म्हणजे त्यांचा जन्म 1913 मध्ये झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांच्या पहिल्या गाडीचा नंबर DLD 13 होता. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले. आपल्या मित्राकडून त्यांनी फोटोग्राफी शिकली. 1938 मध्ये त्यांनी व्यावसायिक फोटोग्राफीला सुरूवात केली. 1942 मध्ये त्यांनी दिल्लीत ब्रिटिश इन्फर्मेशन सर्व्हिसेस ऑफ फोटोग्राफरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावर जेव्हा तिंरगा फडकावला जात होता तेव्हा होमाई व्यारावाला तिथे उपस्थित होत्या. त्यांनी अनेक ऐतिहासिक घटनांची क्षणचित्रे आपल्या कॅमे-यात कैद केली होती. राष्ट्रपती भवनात लॉर्ड माऊंटबेटन यांना सलामी देतानाचा फोटो त्यांनी काढला होता. याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरु यांनी बहिण विजय लक्ष्मी यांना अलिंगन देतानाचा फोटोही त्यांनी काढला होता. तसंच महात्मा गांधी आणि अब्दुल गफ्फार खान यांचा फोटो त्यांनी काढला होता. पंडित नेहरु, लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांच्या अंत्यसंस्काराचे क्षणही त्यांनी कॅमे-यात कैद केले होते.
2011 मध्ये त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मान करण्यात आला होता. 2012 मध्ये त्यांचं किरकोळ अपघातानंतर रुग्णालयात उपचार सुरु होमाई व्यारावाला यांचं निधन झालं. गुगलने आज त्यांनी आदरांजली देताना 'फर्स्ट लेडी ऑफ द लेन्स' असा खिताब दिला आहे. गुगलचं हे डूडल मुंबईतील समीर कुलावूर यांनी तयार केलं आहे.