नवी दिल्ली - रविवार १५ ऑगस्ट रोजी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला होता. त्याबरोबरच अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली. दरम्यान, तालिबानच्या हातात सत्तासूत्रे आल्यानंतर अनेक जणांनी अफगाणिस्तान सोडून बाहेरील देशांत आश्रय घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे. (Gissar Military Aerodrome) भारतानेही अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना देशात परत आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना सुखरूपपणे मायदेशात आणण्याच्या मोहिमेमध्ये भारताच्या परदेशातील पहिल्या एअरबेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. (This is India's first overseas airbase, playing an important role in relief work in Afghanistan)
भारतीयांना मायदेशात आणण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या एअरबेसचे नाव आहे गिसार मिलिल्ट्री एरोड्रम. हा एअरबेस मध्य आशियातील ताजिकिस्तान या देशात आहे. हा एअरबेस अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या अगजी सीमारेषेवर आहे. गेल्या दोन दशकांपासून या एअरबेसचे प्रशासन भारत आणि ताजिकिस्तान संयुक्तरीत्या पाहत आहेत.
गिसार मिलिट्री एरोड्रम हा भारताचा परदेशातील पहिला एअरबेस आहे. हा एअरबेस लष्करी आणि अन्य कामांसाठी ताजिकिस्तान आणि भारताकडून संयुक्तरीत्या चालवला जातो. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर काबुलमधून शेकडो भारतीयांना बाहेर काढताना या एअरबेसचे भौगोलिक स्थान उपयुक्त ठरले.
हा एअरबेस जीएमए अयानी एअरबेस या नावाने अधिक प्रसिद्ध आहे. हा एअरबेस ताजिकिस्तानची राजधानी दुशन्बेपासून १० किलोमीटक पश्चिमेस अयानी नावाच्या गावामध्ये आहे. या एअरबेसच्या स्थापनेमध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि भारतीय हवाईदलाचे माजी प्रमुख बीएस धनोआ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच्या निर्मितीचा खर्च परराष्ट्र मंत्रालयाने उचलला होता.
अफगाणिस्तानमध्ये अंधाधुंदी माजल्यानंतर ए सी -१३० या विमानाने ८७ भारतीयांना काबुलमधून ताजिकिस्तानमध्ये सुरक्षितपणे आणले होते. त्यानंतर हे नागरिक एअर इंडियाच्या विमानामधून भारतात पोहोचले होते. काबुलमध्ये माजलेल्या अंधाधुंदीच्या पार्श्वभूमीवर सी-१७ विमान जीएमएवरच ठेवण्यात आले होते.