ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि.6 - पब्लिक प्रायव्हेट, पार्टनरशिप म्हणजे पीपीपी मॉडेलवर भोपाळमधील हबीबगंज स्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. अशाप्रकारे विकास करण्यात य़ेणारे हे देशामधले हे पहिले स्थानक आहे. 9 जून रोजी या स्थानकाच्या विकासकामाचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सोयी या स्थानकावर उपलब्ध असतील. या स्थानकाच्या देखभाल आणि सुविधांची बांधणी करण्याचा अधिकार भोपाळमधील बन्सल समुहाला आठ वर्षांच्या कराराने देण्यात आलेला आहे. आता या स्थानकाचा पूर्ण चेहरामोहरा बदलण्यात येणार असून, प्रवाशांसाठी सोयी बन्सल समुहाच्य़ा माध्यमातून येत्या तीन वर्षांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येतील. अर्थात रेल्वे, पार्सलसेवा, प्रवासी तिकीट ही सर्व कामे रेल्वेदारेच होतील.
पर्यावरणपूरक असे हे नवे स्थानक सौरऊर्जेवर चालवण्यात येईल. प्रवाशांसाठी सरकते जीवन, अंपंगासाठी मदतीसाठी सुविधा त्यामध्ये असतील. कोणत्याही धोकादायक प्रसंगी चार मिनिटांमध्ये संपूर्ण स्थानक रिकामे करता येईल आणि सहा मिनिटांमध्ये लोक सुरक्षीत जागी पोहोचतील अशी व्यवस्थाही त्यामध्ये करण्यात येईल. प्रवाशांसाठी विश्रांतीगृह, हॉटेल्स, स्टॉल्स, पार्किंग यांची निर्मिती आणि देखभाल बन्सल समूह करेल. 2009 साली अशा प्रकारची जागतिक दर्जाची स्थानके निर्माण करण्याची संकल्पना तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मांडली होती. परंतु त्याला खरी सुरुवात 2015 साली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या काळामध्ये करण्यात आली. या संकल्पनेअंतर्गत देशभरात 400 ए-वन आणि ए दर्जाची स्थानके विकसित करण्यात येतील.