भारताच्या सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश एम. फातिमा बीवी यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. देशाच्या उच्च न्यायव्यवस्थेत नियुक्त झालेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या. न्यायाधीश फातिमा बीवी यांचा जन्म १९२७ मध्ये केरळमध्ये झाला होता.
केरळमधील पंडालम येथील असलेल्या न्यायमूर्ती बीवी यांनी तिरुअनंतपुरमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती. त्यांचे शालेय शिक्षण हे पथनामथिट्टा येथील कॅथलिक हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. १९५० मध्ये बार कौन्सिलच्या परीक्षेत फातिमा बीवी यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच, त्या बार कौन्सिल गोल्ड मेडल मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
केरळमध्ये वकील म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर १९८३ मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या आणि इतिहास रचला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून, त्या उच्च न्यायव्यवस्थेतील पहिल्या मुस्लिम महिला आणि आशियाई देशात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
फातिमा बीवी १९९३ मध्ये निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी प्रथम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले. राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांनी तामिळनाडू विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणूनही काम केले. १९९० मध्ये त्यांना डी.लिट पुरस्कार मिळाला होता. तसेच, भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस- इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.