ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि, ११ - पाकिस्तानकडून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारत हायटेक योजना आखत आहे. पाकिस्ताकडून होणा-या घुसखोरीवर नियंत्रम ठेवण्यासाठी पाच-स्तरीय सुरक्षा प्रणाली आखण्यात आली आहे. केंद्रानेदेखील या सुरक्षा प्रणालीला मान्यता दिली आहे. या सुरक्षा प्रणालीनुसार पश्चिमेकडील 2900 किमीवरील सीमा सुरक्षारेषा पुर्णपणे लॉक करण्यात येणार असून यामुळे दहशतवादी आणि तस्करी घुसखोरांवर आळा घालण्यास मदत मिळणार आहे.
या सुरक्षा प्रणाली अंतर्गत सीमारेषेवर पुर्णवेळ लक्ष ठेवण्यात येणार असून सीआयबीएमएसच्या देखरेखेखाली असणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने 24 तास सीमारेषेवर लक्ष ठेवण्यास मदत मिळणार आहे. यामुळे सीमारेषेपलीकडून होणा-या सर्व हालचालींवर नजर ठेवणे शक्य होणार आहे.
या सुरक्षा प्रणालीत सीसीटीव्ही कॅमेरा, थर्मल इमेज, मॉनिटरिंग सेन्सर्स, लेजर बॅरिअर्स यांचा समावेश असणार आहे. कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टीमच्या आधारे लगेच धोक्याची सूचना मिळणार आहे ज्यामुळे कारवाई करणं शक्य होईल. यामध्ये लेजर बॅरिअर्सची मुख्य भुमिका असणार आहे कारण ज्या ठिकाणी जवान तैनात नाहीत अशा 130 ठिकाणी यांची मदत मिळणार आहे. नदीकाठ तसंच डोंगरावरील प्रदेश ज्यांचा अनेक वेळा घुसखोरीसाठी वापर केला जातो अशा ठिकाणी हे लेजर बॅरिअर्स फायद्याचे ठरणार आहेत.