चीनमध्ये होणाऱ्या यंदाच्या आशियाई क्रिडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण १०० पदके पटकावली आहेत. यामध्ये २५ सुवर्णपदके आहेत. भारताच्या मुलींनी महिला कबड्डीमध्ये चिनी तैपेईचा २६-२४ असा रोमहर्षक अंतिम सामन्यात पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारतासाठी हे ऐतिहासिक सुवर्णपदक ठरले. कारण यामुळे भारताला एकूण १०० वे पदक आणि २५ वे सुवर्ण मिळाले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०० पदके पूर्ण करणे ही एक महत्त्वाची कामगिरी असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, १० ऑक्टोबर रोजी आशियाई स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक टीमचं आणि खेळाडूंचं मी स्वागत करणार आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट केले, “प्रत्येक आश्चर्यकारक कामगिरीने इतिहास रचला आणि आमचे हृदय अभिमानाने भरले. मी १० ऑक्टोबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत करीन आणि त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचं मोदी यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात देशाने १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांचे शतक पूर्ण केले आहे. स्पर्धेच्या १३व्या दिवशी, भारताने हॉकीमध्ये सुवर्णासह नऊ पदके जिंकली आणि पदकांची संख्या ९५ वर नेली. १४व्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय तिरंदाजांनी चार पदके जिंकली आणि त्यानंतर कबड्डी संघाने सुवर्ण जिंकून भारताचे पदकांचे शतक पूर्ण केले. भारताने पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, आठव्या दिवशी १५, नवव्या दिवशी सात, दहाव्या दिवशी नऊ, ११व्या दिवशी १२, १२व्या दिवशी आणखी पाच, १३व्या दिवशी नऊ पदके जिंकली होती.