मुंबई - देशभरात आज 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळेपासून ते दिल्लीच्या राजपथापर्यंत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुगलनेही डुडलद्वारे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सन्मान केला आहे. गुगलने अतिशय शानदार असे हे डुडल सजवले आहे. या डुडलमध्ये राष्ट्रपती भवनासमोर घडणाऱ्या देशातील विविध संस्कतीचे दर्शन होते.
प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनादिवशी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रपती भवनसमोरील राजपथावर तिन्ही सैन्य दलाकडून मानवंदना देत शक्तिप्रदर्शन करण्यात येते. तसेच देशाच्या विविध राज्यांच्या कानाकोपऱ्यातील संस्कृतीचे दर्शनही चित्राकृतीच्या माध्यमातून घडविण्यात येते. गुगलनेही भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या याच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन जगाला घडवले आहे. विशेष म्हणजे गुगल इंडियाने ट्विटरवरुन हे डुडल शेअर केले आहे. तसेच राजपथावर 1955 साली पहिल्यांदा परेड घेण्यात आले होते. आता, आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिन डुडलद्वारे साजरा करत आहोत, असे गुगलने ट्विटरवरुन लिहिले आहे.