फुटीच्या राजकारणामुळे भारताची प्रतिमा मलिन होते आहे; राहुल गांधींचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 08:41 AM2017-09-21T08:41:54+5:302017-09-21T13:43:47+5:30
अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स स्क्वेअरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं.
न्यू यॉर्क, दि. 21- अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी न्यूयॉर्कमधील ऐतिहासिक टाइम्स स्क्वेअरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं. मॅरियट मार्किस हॉटेलमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा रोजगाराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली. तसंच हिंसक घटना आणि असहिष्णुतेमुळे दुनियेत भारताची प्रतिमा मलिन झाल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
भारतात सध्या फुटीचं राजकारण केलं जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. भारतामधील सहिष्णुता दिवसेंदिवस कमी का होत चालली आहे? एकेकाळी भारत ज्या एकोप्याच्या मूल्यासाठी ओळखला जात होता, तो कुठे हरवला, असा प्रश्न सध्या जगभरातून विचारला जात आहे. भारताला शांती आणि एकोप्याचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. पण, सध्या देशात फुटीचे राजकारण सुरू आहे. या शक्ती समाजात फूट पाडत आहेत. त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप राहुल यांनी केला
भारत हजारो वर्षापासून एकता आणि शांतीने राहणार देश म्हणून दुनियेत ओळखला जातो. पण आता भारताच्या या प्रतिमेला मलिना केलं जात आहे. देशात काही अशा शक्ती आहेत ज्या भारताची वाटणी करत आहे, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. काँग्रेसच्या काळात विविध धर्मांचे लोक भारतात शांतीने नांदत होते. काही लोक भारताकडे फक्त एक भूभाग म्हणून बघतात. पण, मी भारताकडे अनेक विचारांचा समूह म्हणून पाहतो. काँग्रेस पक्षाच्या धोरणामुळे आजपर्यंत या ठिकाणी अनेक धर्म, भाषा बोलणारे लोक आनंदाने राहत होते. सध्या जगातील अनेक देशांमध्ये हिंसाचार सुरू आहे. मात्र, हे देश विविध समूहांना एकत्र घेऊन नांदणाऱ्या भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपल्याला गमावून चालणार नाही, असं राहुल गांधी यांनी म्हंटलं आहे.
Biggest questions raised outside India now are what happened to tolerance that used to prevail? What happened to the harmony?: Rahul Gandhi
— ANI (@ANI) September 21, 2017
भारतात रोजगार हेच खरं चॅलेन्ज
भारतात दर दिवशी 30 हजार तरूण नोकरीसाठी जॉब मार्केटमध्ये येतात. पण त्यापैकी फक्त 450 मुलांनाच रोजगार मिळतो. हेच आज भारतासमोरील सगळ्यात मोठं आव्हान आहे. भारतातील रोजगाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं. भारतात रोजगाराची समस्या यासाठी आहे, कारण सध्या फक्त 50-60 कंपन्यांवर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. जर रोजगार वाढवायचा असेल तर छोट्या कंपन्यांनाही प्रोत्साहन द्यायला हवं, असं राहुल गांधी यांनी म्हंटलं.
Every day 30,000 new people enter the job market in India but only 450 are getting employed: Rahul Gandhi
— ANI (@ANI) September 21, 2017
अनिवासी भारतीय हाच भारताचा कणा
या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी अनिवासी भारतीय समुदायाचं कौतुक करत ते भारताचा कणा असल्याचं म्हंटलं. काँग्रेसची खरी चळवळ ही एनआरआय चळवळ होती. गांधी, नेहरू, पटेल हे अनिवासी भारतीय होते. या सगळे विदेशात राहिले आणि त्यांनी भारतात परतून देशासाठी काम केलं.
जनसभेचं नेमकं कारण काय ?
खरं तर राहुल गांधींची ही जाहीर सभा काँग्रेसच्या परराष्ट्र कार्यालयाने पक्षामध्ये अनिवासी भारतीयांना समाविष्ट करण्याच्या योजनेखाली आयोजित केली आहे. सॅम पित्रोदा काँग्रेसचे प्रवास विभागाचे अध्यक्ष आहेत.