नवी दिल्ली : इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखर यादव यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची तयारी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीने सुरू केली आहे. हा प्रस्ताव आणण्यासाठी नोटीस देण्यासाठी विरोधकांनी मोहीम सुरू केली असून त्यावर खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत.
महाभियोग प्रस्तावाच्या नोटिशीवर आतापर्यंत ३८ सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. बुधवारी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या होऊ शकल्या नाहीत.
गुरुवारपर्यंत या प्रस्तावावर किमान ५० खासदार स्वाक्षऱ्या करणार असून त्यानंतर नोटीस पुढे पाठवली जाणार असल्याचे काँग्रेस खासदार विवेक तन्खा यांनी सांगितले. चालू हिवाळी अधिवेशनात न्या. यादव यांच्याविरोधातील महाभियोगाची नोटीस दिली जाणार आहे. या प्रस्तावाशी संबंधित नोटीस १०० लोकसभा खासदार किंवा ५० राज्यसभा सदस्यांनी सादर करणे आवश्यक आहे. विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना न्या. यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी महाभियोग प्रस्तावासंदर्भात नोटीस दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
महाभियोगाला कॅथोलिक संस्थेचा पाठिंबा न्या. शेखर यादव यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यासंदर्भात विरोधकांनी घेतलेल्या निर्णयाला कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया अर्थात सीबीसीआयने पाठिंबा दिला आहे. देश बहुसंख्यांच्या इच्छेनुसार चालेल असे वादग्रस्त वक्तव्य न्या. यादव यांनी केले आहे. बुधवारी एक निवेदन जारी करत सीबीसीआयने न्या. यादव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.