नितीश कुमारांमुळे तुटणार इंडिया आघाडी? जेडीयूच्या या सल्ल्यानं वाढली काँग्रेसची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 06:03 PM2023-12-31T18:03:03+5:302023-12-31T18:03:44+5:30
Nitish Kumar: नुकतीच झालेली जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा आणि नितीश कुमार यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे चर्चेत राहिली. या दोन्ही घटनांच्या चर्चेमध्ये जेडीयूकडून देण्यात आलेला एक महत्त्वाचा सल्ला झाकोळून गेला.
नुकतीच झालेली जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा आणि नितीश कुमार यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे चर्चेत राहिली. या दोन्ही घटनांच्या चर्चेमध्ये जेडीयूकडून देण्यात आलेला एक महत्त्वाचा सल्ला झाकोळून गेला. मात्र आता तो चर्चेचा विषय बनला आहे. तसेच येणाऱ्या काळासाठी त्यातून महत्त्वाचा संकेतही मिळत आहे.
इंडिया आघाडीमध्ये अशा नेत्याकडे जबाबदारी देण्यात यावी जो अनुभवी आणि कार्यक्षम असेल, असा सल्ला जेडीयूकडून देण्यात आला होता. मोठ्या पक्षाने उदार बनण्याची गरज असल्याचा सल्लाही जेडीयूकडून काँग्रेसचं नाव न घेता देण्यात आला आहे.
इंडिया आघाडीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये जेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. ही बाब जेडीयूला रुचली नव्हती. जेडीयूने यावर आक्षेपही नोंदवला होता.
आता नितीश कुमार यांच्या उपस्थितीत अनुभव आणि कार्यक्षमतेच्या अनुरूप कुठल्याही नेत्याला इंडिया आघाडीचं नेतृत्व देण्यात आलं पाहिजे, अशी चर्चा जेडीयूकडून सुरू करण्यात आली आहे. नितीश कुमार हे देशातील पर्यायी राजकारणाचे प्रस्तावक आहेत. इंडिया आघाडीच्या सर्व बैठकांमध्ये त्यांनी इंडिया आघाडीचं सूत्रधार म्हटलं जातं, असे जेडीयूनं म्हटलं आहे.
जेडीयूने स्पष्टपणे सांगितलं की, जर या महाआघाडीला यशस्वी व्हायचं असेल तर मोठ्या पक्षांना मोठं मन दाखवावं लागेल. दरम्यान, पुढील घडामोडींचे संकेत देणाऱ्या जेडीयूच्या सल्ल्यानंतर बिहारमधील महाआघाडीच्या जागावाटपाबाबत पुढील आठवड्यात चर्चा होणार आहे. बिहारमधील जुन्या आकड्यांवरून सर्व काही निश्चित मानले जात आहे. आपल्याला कोणकोणत्या जागा मिळतील याबाबतही जेडीयूमध्ये चर्चा सुरू आहे.