पुणे : यंदा दणक्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पावसाचा (मान्सून) दुसरा सुधारित अंदाज मंगळवारी आयएमडीने जाहीर केला. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने यावेळी पहिल्यांदाच देशातील ३६ हवामान विभागांतल्या पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. प्रशांत महासागरात ‘ला निनो’ स्थिती तयार झाल्याचा फायदा मान्सूनला होणार आहे. त्यामुळे उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता आहे. भारताच्या दृष्टीने शेतीचे क्षेत्र व त्या ठिकाणी पडणारा पाऊस अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने हवामान विभागाने यंदा प्रामुख्याने शेतीक्षेत्राचा समावेश असलेल्या कोअर झोन निश्चित केला आहे. त्या ठिकाणी १०६% पाऊस पडण्याचा अंदाज आहे.कोकण, पूर्व विदर्भात जूनमध्ये अधिक पाऊसहवामान विभागाने यंदा प्रथमच हवामान विभागानुसार अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार कोकण आणि पूर्व विदर्भात जूनमध्ये सरासरीच्या तुुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जूनमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. आगमन उशिरा?सध्या केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. अंदमानात पोहोचलेला मान्सून केरळात पोहोचल्याचे जाहीर करण्यासाठी आवश्यक पाऊसमान, वाऱ्यांची दिशा हे निकष अजून पूर्ण झालेेले नाहीत. यंदा मान्सून केरळात थोडा उशिरा म्हणजे ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. पुढील वाटचालीस उशीर होऊ शकतो.दुष्काळाची शक्यता अगदी कमी‘मॉन्सून मॉडेल’नुसार यंदा दुष्काळ म्हणजेच सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता फक्त ८ टक्केच आहे. सरासरीच्या ९० ते ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता १८ टक्के आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ अशा सर्वसाधारण पावसाची शक्यता ४०% आहे. सरासरीपेक्षा जास्त १०४ ते ११० टक्के पावसाची शक्यता २२ टक्के आहे, तर खूप जास्त म्हणजे सरासरीच्या ११० टक्के पावसाची शक्यता १२ टक्के आहे.
यंदा दणक्यात पाऊस! तब्बल १०१ टक्के बरसणार; भारतीय हवामान विभागाचा सुधारित अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 6:58 AM