लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना रविवारी भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) मंजुरी दिली. त्यामुळे आता देशव्यापी लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील आठवड्यापासून लसीकरण मोहीम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनी व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेली आणि वापरास मंजुरी मिळालेली कोव्हॅक्सिन ही पहिली स्वदेशी लस ठरली आहे. दरम्यान, झायडस कॅडिला लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे. पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय औषध मानक नियामक संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी केली होती.
आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आलेल्या दोन्ही लसी भारतात तयार झाल्या आहेत, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शास्त्रज्ञ आतुर आहेत, हेच यातून निदर्शनास येते. कोरोनाकहरात प्राणाची बाजी लावून काम करणाऱ्या कोरोनायोद्ध्यांप्रति पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भारतात तयार झालेल्या लसींमुळे कोरोना महासाथीला आळा बसेल. तसेच कोरोना विरोधातील लढाई अधिक बळकट होईल. लसीचा वापर प्राधान्यक्रमाने गरजू लोकांवर होणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणांनी त्यास प्राधान्य द्यावे.- डॉ. पूनम खेत्रपालसिंग, विभागीय संचालक, डब्ल्यू एचओ