आपण आपल्या देशाचा 72वा स्वातंत्र दिन साजरा करत आहोत. पण आपल्या देशाबाबतच्या अजूनही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ठाऊक नाहीत, किंवा आपण त्या जाणून घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. आपल्या देशातील सर्व पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापण्यात आलेली असते. त्याचप्रमाणे शाळा भरताना जेव्हा राष्ट्रगीत होतं त्यावेळीही प्रतिज्ञा बोलायला सांगण्यात येते. पण आपल्या स्वतंत्र भारताची ही राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली, हे अद्याप आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नाही.
आंध्र प्रदेशमधील सुप्रसिद्ध तेलगु साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये तेलगू भाषेमध्ये आपल्या स्वतंत्र भारताची पहिली प्रतिज्ञा लिहीली होती. पण अद्याप स्पष्टपणे कुठेही त्यांचा लेखक म्हणून नावाचा उल्लेख आढळून येत नाही. सुब्बाराव यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावात झाला होता. त्यांनी संस्कृत, तेलगु, इंग्रजी आणि अरेबिक या भाषांमधून आपलं पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यांची ‘कालाभरवाहू’ नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली. राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेल्या आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा 1962मध्ये लिहिली होती. सुब्बाराव यांच्या मित्राने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू यांना ही प्रतिज्ञा दाखवली. त्यांना ही प्रतिज्ञा फार आवडली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक शाळांमध्ये ती प्रतिज्ञा घेण्याचा आदेश दिला.
डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया या समितीच्या शिफारशीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये , तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी याकरता सुब्बाराव यांच्या तेलगु प्रतिज्ञेचे भाषांतर करून India is My Country, All Indians are my brothers & sisters... ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व पुढे असेही सूचित करण्यात आले की, ही प्रतिज्ञा देशपातळीवर 26 जानेवारी 1965 पासून लागू करावी असेही सुचवण्यात आले. त्यानंतर या प्रतिज्ञेचा देशातील सर्व भाषांमध्ये भाषांतर करून त्यानंतर ती सर्व पाठ्यपुस्तकांच्या पहिल्या पानावर छापण्यात आली. त्यानंत ती केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादीत न ठेवता. तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देण्यात आला.